मावळच्या तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या घरावर दरड कोसळल्याने घर जमीनदोस्त झाल्याची घटना समोर आली आहे. दैव बलवत्तर असल्याने घरातील ११ जणांचे प्राण वाचले आहेत. तर, आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर जमीन खचल्याचं निदर्शनास आल्याने गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. दरड कोसळून सीताराम पठारे यांच्या घराचे आणि किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे.

सविस्तर माहिती अशी की, सीताराम पठारे यांचे तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी घर असून त्यातच त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांच्या कुटूंबात एकूण ११ व्यक्ती आहेत, त्यात तीन लहान मुलांचा समावेश असून सीताराम पठारे व्यतिरिक्त सर्व जण शेतात गेले होते. तर, पठारे हे एकटेच दुकानात होते. मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून गुरुवारी २४ तासात तब्बल २०७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

दरम्यान, पठारे हे दुकानात ग्राहक नसल्याने दुकान बंद करू बाहेर पडले. ते काही अंतरावर जाताच मोठा आवाज आला. परत येऊन पाहिले असता घर आणि दुकान जमीनदोस्त झाले असल्याचं समोर आलं. या घटनेमुळे पठारे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घराचे आणि दुकानाचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. घरातील व्यक्ती आणि पठारे घराबाहेर असल्याने सुदैवाने जीविहितहानी घडली नाही. दैव बलवत्तर असल्याने ते बचावले आहेत अस म्हणावं लागेल.

या घटनेनंतर आजूबाजूची पाहणी केली असता जमीन खचल्याच समोर आलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशी माहिती तेथील स्थानिकांनी दिली आहे. या घटनेकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्याव अस गावकऱ्यांची मागणी आहे.