पती आणि पत्नी या नात्याचा आधार असतो ते म्हणजे विश्वास आणि प्रेम. मात्र पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव स्मृती रुग्णालयात घडलेली घटना पती पत्नीच्या नात्याचा मुख्य आधारच हिरावणारी ठरली आहे. सलीम शेख या माणसाने त्याची कॅन्सरग्रस्त पत्नी आणि दोन मुले यांना रुग्णालयाच्या भरवशावर टाकून पळ काढला आहे. सलीम आणि रुखसाना या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. संसाराचा गाडा चालवण्यासाठी दोघेही मदारी खेळ करत असत.

१२ वर्षांपूर्वी सलीम आणि रुखसाना या दोघांचीही ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या दोघांनीही लग्न केले. या दोघांना लग्नानंतर काही वर्षांनी दोन मुलेही झाली. अरमान आणि अंजूम अशी या दोघांची नावे आहेत. मागील काही महिन्यांपासून हे सगळेच पिंपरीतील कासारवाडी भागात राहण्यास आले. मदारी खेळ करुनही या दोघांचा संसार सुरळीत सुरु होता. अशात काही महिन्यांपासून रुखसाना आजारी झाली. तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यानच रुखसानाला कॅन्सर असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच पती सलीम याच्या पायाखालची जमिनी सरकली,पती मदारीचा खेळ करत असल्याने तूटपुंज्या पैश्यावर संसार चालवत होता. परंतु, पत्नीला कॅन्सर असल्याचं समजताच पती दोन वेळेस रुग्णालयात आला,त्यानंतर तो रुग्णालयात फिरकलाच नाही.पत्नी रुखसाना सोबत दोन मुलं देखील रुग्णालयातच आहेत. या घटनेमुळे रुग्णालयात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान चिमुकल्यांना पुण्याच्या महिला व बालकल्याण समितीकडे अर्ज करुन अनाथ आश्रमात ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.रिअल लाईफ रिअल पिपल संस्थेचे एम. हुसैन,वायसीएमचे समाजसेवक महादेव बोत्रे,वर्षा भोसले त्या दोन्ही मुलांची काळजी घेत आहेत.परंतु पत्नीला ज्या काळात पतीची अत्यंत गरज होती त्याच काळात पतीने पळ काढला आहे.