22 April 2019

News Flash

पुणे शहराची ओळख प्रदूषित म्हणून होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पुण्यात वाहनांची संख्या अधिक आहे.

पुणे शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. या विस्तारीकरणामुळेच मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्याही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पुण्यात वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सहाजिकच येथे प्रदुषणाची समस्या निर्माण होऊ लागली आहे. परिणामी, भविष्यामध्ये पुण्याची ओळख प्रदूषित शहर म्हणून होईल, अशी शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी आणि भविष्यात प्रदूषित शहर ही ओळख मिळण्यापूर्वीच प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज असून नागरिकांना चांगल्या सुविधा द्यावी. अशा सूचना देखील त्यांनी यावेळी केल्या.

स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट इलेक्ट्रिक बस, स्मार्ट सिटी आॅपरेशन्स सेंटर, आॅफिस राइड, बाणेर येथील स्मार्ट रस्ते पुनर्रचना, प्लेसमेकिंग साइट, स्मार्ट स्कूल्स आणि सायन्स पार्क अशा तब्बल सात प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले की, पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यातून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल आणि नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

तसेच ते पुढे म्हणाले की, केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या माध्यमातून पुण्यात मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाला गती असून दिलेल्या वेळेपूर्वी नागरिकांच्या सेवेत असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on February 9, 2019 6:09 pm

Web Title: the identity of pune city will be polluted cm devendra fadnavis