काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे सामान्य माणसाला आधार देणारा नेता हरपला आहे असे म्हणत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे समाजात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी कायम सामान्य माणसाला आधार देण्याचे काम केले. तसेच जी पदे त्यांना देण्यात आली ती त्यांनी चांगल्या रितीने भुषवली असेही प्रतिभा पाटील म्हणाल्या.

पुण्यातील सिंहगड या निवासस्थानी पासून सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास पतंगराव कदम यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली.त्यावेळी त्यांची पत्नी,पुत्र विश्वजीत कदम, सुना, नातवंडे उपस्थित होते. त्यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील,पालकमंत्री गिरीश बापट,माजी खासदार सुरेश कलमाडी, खासदार श्रीरंग बारणे,प्रणिती शिंदे,सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी पतंगराव कदम यांचे अंत्यदर्शन घेतले.

त्यानंतर ही अंत्ययात्रा बीएमसीसी समोरील सिंहगड या निवासस्थानापासून सुरू झाल्यावर पुढे जाऊन अलका चौकातील भारती भवन जवळ काही काळ कर्मचारी वर्गासाठी अंत्य दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले.त्यावेळी सर्व कामगार,कर्मचारी शोकसागरात बुडल्याचे पाहाव्यास मिळाले.त्यानंतर कात्रज चौकाजवळील भारती विद्यापीठामध्ये दिवंगत काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.त्यांचे दर्शन घेण्यासाठी आजी माजी विद्यार्थी आणि कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.