वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीची नियमावली कागदावर

मार्केट यार्डातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी तसेच कोंडी सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून नियमावलीची अंमलबजावणी लागू करण्यात आली. नियमावली लागू केल्यानंतर काही महिने बाजार आवाराला शिस्त लागली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मार्केट यार्डात पुन्हा कोंडी होत आहे. मार्केट यार्डातील गाळय़ांसमोर आणि रस्त्यावर शेतीमाल वाहतूक करणारी वाहने थांबवून विक्री केली जात आहे. त्यामुळे बाजारात येणारे खरेदीदार आणि नागरिकांना कोंडीतून वाट काढावी लागत आहे. मार्केट यार्डात राज्य तसेच परराज्यातून शेतीमाल विक्रीसाठी पाठविला जातो. मार्केट यार्डातील कोंडी ही नित्याची बाब झाली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी बाजार समितीच्या प्रशासनाने फळ, फुले, भाजीपाला आणि भुसार विभागातील व्यापाऱ्यांची एक समिती तयार केली. मार्केट यार्डातील कोंडी सोडविण्यासाठी नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यात आली. सुरुवातीला नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यानंतर बाजार आवाराला शिस्त लागली. काही आडत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस बाजार समितीने कठोर कारवाई केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बाजार आवारात पुन्हा कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी करण्यात आलेली नियमावली फक्त कागदावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बाजार समितीकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा वेग मंदावला आहे. काही आडत्यांनी गाळय़ासमोर शेतीमालाची विक्री सुरू केली आहे. शेतीमालाची रिकामी वाहने बाजारात उभी राहत असल्याने कोंडीत भर पडत आहे.

लिंबे विक्रेते मोकाट

मार्केट यार्डातील तरकारी विभागात लिंबे विक्रेते अनधिकृतपणे विक्री करत आहेत. लिंबे विक्रे त्यांमुळे कोंडीत भर पडत आहे. शेतीमाल बाजारात आणणे अवघड होत आहे. बाजार समिती आडत्यांवर कारवाई करते, पण अनधिकृत लिंबे विक्रेत्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप बाजार आवारातील घटकांनी केला आहे.

दुपारनंतरही किरकोळ विक्री

नवीन नियमावलीची अंमलबजावणी लागू केल्यानंतर फळ विभागात दुपारी दोन वाजेपर्यंत विक्री करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, दुपारनंतर किरकोळ विक्री सुरू असते.मार्केट यार्डाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांनी जागा व्यापली आहे. त्यामुळे  घाऊक बाजारात  खरेदीदार व नागरिकांना कोंडीतून वाट काढावी लागत आहे.