श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला दरवर्षी संगीत महोत्सवाला प्रारंभ होतो. गेली अनेक वर्षे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी करोनामुळे हा संगीत महोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी देखील करोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये वाढत असल्याने महोत्सव रद्द करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने घेतला आहे.

प्रख्यात गायक व संगीतकार पं. ह्रदयनाथ मंगेशकर, संगीतकार श्रीधर फडके, गायिका आशा खाडिलकर यांसह कला, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे कार्यक्रम महोत्सवात आयोजित केले जातात. नवोदित कलाकारांना देखील यामाध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. यावर्षी संगीत महोत्सव रद्द झाल्याने प्रत्यक्षपणे मिळणारा हा आनंद गणेशभक्तांना मिळणार नाही. मात्र, दैनंदिन धार्मिक विधी मंदिरात सुरु राहणार आहेत. भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी आॅनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.

भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे http://www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.