प्रतिष्ठित फोर्ब्ज मासिकात मराठी रंगभूमीवरील नाटकांची दखल घेण्यात आली आहे. मासिकातील रंगभूमीविषयक लेखात ‘संगीत देवबाभळी’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘इंदिरा’, ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांचा गौरव करण्यात आला आहे.

आजच्या काळाशी सुसंगत, दर्जेदार संगीत असलेली नाटकं रंगभूमीवर येत नसल्याची ओरड केली जाते. मात्र, संगीत देवबाभळी आणि अमर फोटो स्टुडिओ ही दोन नाटकं त्याला योग्य उत्तर आहेत. या दोन्ही नाटकांमध्ये कालसुसंगत मांडणी, नव्या जाणिवा, गुणवत्ता ही वैशिष्टय़ आहेतच; शिवाय ही दोन्ही नाटकं व्यावसायिक रंगभूमीवरील असूनही प्रायोगिकतेशी नातं सांगतात, हे त्यांचं वेगळेपण आहे. म्हणूनच व्यावसायिक रंगभूमीवरही या दोन्ही नाटकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. फोब्र्ज मासिकामध्ये मराठी रंगभूमीची दखल घेतली जाणं आनंददायी असल्याची भावना या नाटकांच्या तरुण दिग्दर्शकांनी व्यक्त केली.

संगीत देवबाभळी या नाटकात संत तुकाराम महाराजांची पत्नी आवली आणि रखुमाई यांच्यातील हृद्य संवाद संगीताच्या माध्यमातून उलगडला आहे. एकांकिका ते व्यावसायिक नाटक असा प्रवास या नाटकाच्या बाबतीत घडला आहे. संगीत देवबाभळीचा लेखक दिग्दर्शक प्राजक्त देशमुख म्हणाला, ‘फोब्र्जसारख्या मान्यवर मासिकाकडून दखल घेतली जाणं खूप मोठी घटना आहे. या नाटकानं सगळे महत्त्वाचे पुरस्कार मिळवले. थिएटर ऑलिम्पिक्समध्ये सादरीकरणाची संधी मिळाली. प्रेक्षक, समीक्षकांनीही गौरवलं. त्यात फोब्र्जची बातमी आल्यानं भारावून गेलो आहे. संगीत नाटक म्हटल्यावर प्रेक्षक म्हणून आपल्या काही एक धारणा असतात. मात्र, चित्रपटानं संगीत नाटकाच्या धारणा बिघडवल्या आहेत. अशा काळात अत्यंत तर्कशुद्ध आणि नाटय़पूर्ण शक्यता असलेलं संगीत नाटक रंगभूमीवर येतं, प्रेक्षक त्याचं स्वागत करतात याचा आनंद वाटतो.’

‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक मनस्विनी लता रवींद्र यांनी लिहिलं आहे. निपुण धर्माधिकारीनं त्याचं दिग्दर्शन केलं आहे. कॅमेरा किंवा फोटो स्टुडिओरुपी कालयंत्राचा वापर करून वर्तमान आणि भूतकाळाची भन्नाट सरमिसळ या नाटकात करण्यात आली आहे. या नाटकाच्या रूपानं एक वेगळ्या धाटणीचं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं. ‘अमर फोटो स्टुडिओ सुरू होऊन आता दोन वर्षे झाली. प्रेक्षक, समीक्षकांनी त्याचा गौरव केला, पुरस्कार मिळाले. प्रयोगही उत्तम सुरू असताना नाटकाची इतक्या मोठय़ा स्तरावर दखल घेतली जाणं आनंददायी आहे. काळानुरूप नव्या जाणिवा रंगकर्मीच्या नाटकांतून दिसणं स्वाभाविक आहे. माझी सुरुवात समांतर रंगभूमीवरून झाल्यानं ओढा तिकडे आहे. मात्र, अमर फोटो स्टुडिओ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं धाडस होतं. सुदैवानं नाटकातील सगळेच   कलाकार समांतरशी संबंधित असल्यानं त्याचा फायदा झाला. फोब्र्जमधील लेखामुळे आपलं काम कोणीतरी बघत असतं, याची पुन्हा एकदा जाणीव झाली,’ असं निपुणनं सांगितलं.