विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत मुलींच्या हातात तलवारी आणि एअरगन दिसल्याप्रकरणी परिषदेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा मंत्री यांना अटक करण्यासाठी पथके रवाना केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

रविवारी झालेल्या विश्वहिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत चार मुलींच्या हातात एअरगन आणि आणखी पाच मुलींच्या हातात तलवारी घेऊन मिरवत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तर एअरगनचा ट्रिगर दाबून त्यातून मोठ्याने आवाज आल्याचे सांगण्यात येत आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या सुमारे २५० कार्यकर्त्यांसह अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्यध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान इथपर्यंत सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत शोभा यात्रेचे आयोजन केले होते. या शोभा यात्रेत पाच मुली हातात तलवारी घेऊन मिरवत होत्या तर चार मुलींच्या हातात एअरगन होत्या. यावेळी एका मुलीच्या हातात असलेल्या एअरगनचा ट्रिगर दाबल्याने त्यातून गोळीचा आवाज आल्याचे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

दरम्यान, शोभा यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींच्या हातात विनापरवाना सोटे, भाले, दांडके, तलवारी आणि बंदुका असल्याने त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच्या मुख्य पदाधिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना झाल्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी सांगितले.