तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुण्यातून अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची मंगळवारी सकाळी पुणे पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हडपसरमध्ये व्यवसाय करणाऱ्या राठी आडनावाच्या कुटुंबातील २८ वर्षांच्या तरुणाचे सोमवारी संध्याकाळी पाच जणांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्याच्या सुटकेसाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर सोमवारी रात्रीपासूनच पुणे पोलीस अपहरणकर्त्यांचा शोध घेत होते. अपहरणकर्त्यांकडून तरुणाच्या नातेवाईकांना सारखे फोन येत होते आणि खंडणीची मागणी केली जात होती. मोबाईल कॉलवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी यवतजवळ एका ढाब्यावर पोहोचले. तिथे काळ्या रंगाची झेन कार उभी असल्याचे त्यांना दिसले. संशय आल्यामुळे त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि तरुणाची सुटका करत चार आरोपींना अटक केली. अन्य एक आरोपी ऊसाच्या शेतात लपून बसल्याचे समजल्यावर त्यालाही तेथून अटक करण्यात आली.