आपण सर्वच मागील दोन वर्षापासून करोना महामारीचा सामना करीत आहे. या दोन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहेत.यातील एक सण म्हणजे आपल्या सर्वांना कायम उर्जा देणारा तो म्हणजे गणेशोत्सव, हा उत्सव यंदा देखील आपण साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. तरी देखील अनेक भागात लाडक्या गणरायाचे स्वागत त्याच उत्साहात प्रत्येक भाविकांने केल्याचे आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कोथरूड भागात राहणार्‍या सुधीर फडके यांनी गणपती बाप्पासमोर ‘पुणेरी मेट्रो’ चा सुंदर असा देखावा सादर केला आहे. हा मेट्रोचा देखावा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या देखाव्या संदर्भात सुधीर फडके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आम्ही अनेक वर्षापासून गणेश उत्सव काळात विविध घटनांवर आधारित देखावे गणपती बाप्पा समोर सादर केले.आम्ही गतवर्षी राम मंदिराचा देखावा सादर केला आहे.यंदा आपण कोणता देखावा करायचा अशी चर्चा कुटुंबियांमध्ये केली. तेव्हा मेट्रोचा करुयात असे ठरले. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तीन दिवसात मेट्रोचा देखावा तयार केला आणि त्याला पुणेरी मेट्रो नाव दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की,आपल्या शहरात मेट्रो पूर्ण क्षमतेने ज्यावेळी धावेल,तेव्हा सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होण्यास मदत होईल. तसेच प्रत्येकाने मेट्रोमधून प्रवास केल्यावर निश्चित प्रदूषण पातळी देखील कमी होण्यास मदत होणार आहे.पण आपल्या इथे लवकर मेट्रो होण्याची गरज होती. मात्र येथील अति राजकारणामुळे विलंब झाल्याची खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.