नौकानयनपटू दत्तू भोकनळ याची भावना

जकार्ता येथे १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील नौकानयनाच्या (रोईंग) वैयक्तिक स्पर्धेपूर्वी बोट पाण्यात उलटल्याने नाका-तोंडात पाणी गेले. त्यामुळे स्पर्धेचे दडपण आले आणि वैयक्तिक पदक गमावले, मात्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्याचे समाधान असल्याची भावना नौकानयनपटू दत्तू भोकनळ याने व्यक्त केली.

सुभेदार स्वर्णसिंह, दत्तू भोकनळ, सुखमीत सिंह आणि ओमप्रकाश यांच्या संघाने जकार्ता येथे झालेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मायदेशात परतल्यानंतर या संघाने पुण्यातील कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनीअरिंग येथे पत्रकारांशी संवाद साधला.

दत्तू भोकनळ म्हणाला, ‘वैयक्तिक पदक गमावल्यानंतर आत्मविश्वास कमी झाला, मात्र आत्तापर्यंत केलेला सराव आठवून कोणत्याही अडचणींवर मात करुन पदक मिळवायचेच असा निश्चय केला. त्यानंतर झालेल्या अंतिम सामन्यात सांघिक कामगिरी करुन सुवर्ण पदक मिळवल्याचे समाधान वैयक्तिक पदकापेक्षा मोठे आहे.’

वैयक्तिक कांस्यपदक प्राप्त केलेला दुष्यंत कुमार म्हणाला,की हरियाणामध्ये माझे आईवडील असून भाऊ जम्मू—काश्मीरमध्ये लष्करात कार्यरत आहे. लष्करात दाखल होण्यापूर्वी मी कबड्डी आणि कुस्ती खेळत असे. २०११ मध्ये लष्करात दाखल झाल्यानंतर अ‍ॅथलेटिक्सचा खेळाडू म्हणून कामगिरी करत होतो. मात्र, प्रशिक्षकांनी मला नौकानयन या खेळाविषयी माहिती दिली आणि त्यामध्ये खेळण्याविषयी सांगितल्याने या खेळाकडे वळलो.

दक्षिण कोरिया येथे २०१४ मधील आशियाई स्पर्धेत दुष्यंत कुमारने कांस्यपदक मिळवले होते. यंदा स्पर्धेपूर्वी ताप, खोकला झाला होता. त्यामुळे शरीरातील पाण्याचा अंशही कमी झाला होता. मात्र, मरण पत्करु पण पदक सोडता कामा नये, या विचारानेच प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे बळ दिल्याचे दुष्यंतकुमारने सांगितले.