News Flash

पैशांच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून

शेजाऱ्यांनी त्यांच्या आवाजाकडे लक्ष दिले असते तर कदाचित ते वाचले असते

पिंपरी-चिंचवडमध्ये मुलाने वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दत्ता उर्फ राजेश सुनील पोलकम (वय-३८) याला अटक करण्यात आली असून सुनील मुतय्या पोलकम वय-६८ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा खून पैशांच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, सुनील पोलकम यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी करण्यात आले त्यानंतर तोंड, हात आणि पाय बांधून त्यांचे खोलीमध्ये बंद करण्यात आले होते.  त्यामुळे काही तासांनी रक्तस्त्राव होऊन सुनील यांचा मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितले. तोंड बांधल्यानंतर ते आवाज करत होते. मात्र, बाहेरून कुलूप होते त्यामुळे आवाज येऊन ही शेजाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील मुतय्या पोलकम हे एकटेच दापोडी येथे राहात होते. ते एका नामांकित कंपनीत काम करत असल्याने त्यांना चांगली पेन्शनदेखील मिळायची. मृत सुनील यांनी दोन विवाह केले होते, यापैकी पहिल्या पत्नीला दोन मुली आणि एक मुलगा झाला होता. त्यानंतर त्यांचे पटत नसल्याने रीतसर घटस्फोट घेऊन काही वर्षांनी त्यांनी दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीला दोन मुली असून कालांतराने तिच्यासोबत देखील  त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर मागील तीस वर्पाांसून ते दापोडी येथील एका किरायच्या खोलीत राहात होते.

दरम्यान, पहिल्या पत्नीचा मुलगा हा दापोडीत रिक्षा चालवायचा. सध्या तो काही काम करत नव्हता. मात्र, त्याला मालवाहू रिक्षा (छोटा हत्ती)  घेण्यासाठी पैसे हवे होते. त्याने अनेकदा वडील सुनील यांच्याकडे पैशांची देखील मागणी केली होती. मात्र त्याला सुनील हे दाद देत नव्हते. अखेर मंगळवारी वडिलांनी पैसे दिले नाही तर त्यांना जीवे मारायचं अस ठरवून तो दुपारी त्यांच्या राहत्या घरी गेला. तिथे त्यांच्यात मोठा वाद झाला आणि यातूनच आरोपी मुलगा दत्ता याने वडिलांच्या डोक्यात दगड घातला. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले अशा जखमी अवस्थेत त्यांना त्याने  निर्दयपणे एका खोलीत खुर्चीला बांधले. यानंतर तो खोलीच्या बाहेरून कुलूप लावून पसार झाला. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर २६ तासांनी त्यांचा खून झाल्याचं शेजाऱ्यांमुळे उघड झाले. आरोपी मुलाला काही तासांमध्ये अटक केली आहे. सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलासे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:17 pm

Web Title: the son killed his father over a money dispute msr 87 kjp 91
Next Stories
1 पुणे : चीनचा झेंडा जाळत, चायनामेड टीव्ही, मोबाइल फोडून शिवसेनेकडून निषेध व्यक्त
2 शंभर सीसीटीव्हींची तपासणी व दीडशे आरोपींच्या चौकशीअंती एटीएम फोडणाऱ्यांना अटक
3 प्रतिबंधित भागातील दुकाने उघडली
Just Now!
X