‘लाख’ मोलाची मोटार पक्षशिस्तीच्या चौकटीत बसवली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : शहराकडे ‘मोठं’ राजकीय पद आल्याच्या आनंदात पिंपरी भाजपच्या काही नेत्यांनी मिळून ११ लाखांची मोटार खरेदी केली. गाजावाजा करत मोटारीची चावी महत्त्वाचे पद मिळालेल्या पदाधिकाऱ्याला देण्याचा सोहळा पार पडला. पक्षश्रेष्ठींना हा प्रकार समजताच त्यांनी संबंधितांना फैलावर घेत तत्काळ मोटार परत करण्याचे फर्मान सोडले. मोटारीचा ताबा सोडायचा नाही, यावर ठाम राहून पक्षशिस्तीच्या चौकटीत बसवत ही मोटार ठेवून घेण्यात आली.

भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्तया झाल्या, त्यात काही छोटय़ा पदांसह प्रदेशस्तरीय महत्त्वाचे पद शहराच्या वाटणीला आले. पिंपरी पालिकेच्या माजी नगरसेविका असलेल्या धडाडीच्या महिला पदाधिकाऱ्याला संधी मिळाली. आता संघटनात्मक कामासाठी त्यांना राज्यभर दौरे करावे लागतील, असा युक्तिवाद करत त्यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी करण्यात आली. आठ-दहा जणांनी खर्चाचा वाटा उचलला. खरेदीची औपचारिकता पूर्ण होताच काही असंतुष्टांनी ही ‘मोटारीची गोष्ट’ वरिष्ठांच्या कानावर घातली. भाजपच्या शिस्तीत हा प्रकार बसत नसल्याचे सांगून पक्षश्रेष्ठींनी अनेकांची कानउघडणीही केली आणि ही मोटार तत्काळ शोरूम ला परत पाठवण्याचे फर्मान सोडले.

मोटारीसाठी पुढाकार घेणाऱ्यांना मोटार परत द्यायची नव्हती. कारण ‘इभ्रतीचा’ प्रश्न निर्माण होणार होता. मग, ‘या मोटारीचे करायचे काय’, असा मुद्दा घेऊन अनेक बैठका झाल्या. ही मोटार त्या पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त दिल्याची पळवाट शोधण्यात आली. श्रेष्ठींची मनधरणी करण्याचा प्रयत्नही अयशस्वी ठरला. असे प्रकार वेळीच मोडीत काढले पाहिजे, अन्यथा, अशा भेटवस्तू स्वीकारण्याची परंपराच पक्षात सुरू राहील, अशी चिंता श्रेष्ठींनी व्यक्त केली. चर्चेचे गुऱ्हाळ पार पडल्यानंतर एकदाचा तोडगा निघाला.त्यानुसार, मोटारीची नोंदणी पक्षाच्या नावावर करण्यात आली. पदावर असेपर्यंत ही मोटार वापरण्यास त्या पदाधिकाऱ्याला मुभा देण्यात आली. नंतर मोटारीची मालकी पक्षाकडे ठेवून त्याचा वापर पक्षकार्यासाठी केला जाईल, असे ठरले.

सर्वाचेच मौन

पक्षवर्तुळात बरेच दिवस चर्चेत असलेल्या या प्रकरणावर कसाबसा पदडा पडला. अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरूच आहे. उघडपणे कोणी बोलत नाही. शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी याविषयी कोणतेही भाष्य केले नाही. कार्यालयीन कामकाज पाहणारे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी प्रतिक्रियेस स्पष्ट नकार दिला. इतर पदाधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर मोटारीच्या घटनाक्रमास दुजोरा दिला. मात्र, प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The story of a car given to a bjp worker zws
First published on: 13-08-2020 at 02:47 IST