सुचेता नितीन धुरी यांचा वृद्धाश्रमाशी नऊ वर्षांपूर्वी संबंध आला, तोही एक स्वयंसेवक म्हणून आणि त्या तेथील ज्येष्ठांसाठी कार्यरत झाल्या.

घरातील वातावरण आणि शारीरिक हालचालींवर आलेल्या मर्यादा यामुळे वृद्धाश्रमाच्या सावलीत वाढणाऱ्या ज्येष्ठांसाठी काही करावे ही ऊर्मी त्यांच्या मनात आली ती एका प्रसंगामुळे. सुचेता त्यांच्या ओळखीच्या आजी-आजोबांना भेटण्यासाठी म्हणून अनेकदा एका वृद्धाश्रमात जायच्या. ओळखीच्या आजी-आजोबांच्या शेजारच्या खोलीतील आजींची या निमित्ताने त्यांची ओळख झाली. या आजींनी आपल्याला येणारे एकटेपण त्रासदायक होऊ नये, म्हणून एक उपाययोजना केली होती. त्यांनी त्यांच्या खोलीतील चारही भिंतींना मुलगा, सून, नातवंडे यांची छायाचित्रे लावलेली होती. ते पाहून सुचेता यांचे मन हेलावले. ‘आपण एकटे नाही. आपल्या माणसांमध्ये राहत असल्यासारखे वाटते,’ या आजींच्या उत्तराने सुचेता यांना वाईट वाटले. मग गृहस्थाश्रमाची कर्तव्ये आणि आपला प्रपंच सांभाळतच त्यांनी अशा लोकांसाठी कार्य करायचे ठरवले. योग्य काम शोधेपर्यंत काही काळ लोटला, तोपर्यंत सुचेता यांची मुले देखील मोठी झाली. घरातील जबाबदाऱ्या थोडय़ाशा कमी झाल्या, त्यातच त्यांना ‘निवारा’ वृद्धाश्रमात सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. निवाराबरोबर जोडले गेलेले नाव कै. निर्मला सोवनी. ज्यांना तेथील परिवार वहिनी म्हणून ओळखत असे, त्यांनी सुचेता यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्याबरोबर सुचेता यांनी स्वयंपाकघरातील कामे शिकून घेतली आणि त्या तेथील स्वयंपाकघरातील कामे करू लागल्या. त्या वेळी पत्रलेखन, कार्यालयीन कामांपासून तेथील ज्येष्ठ नागरिकांना जेवण वाढणे, आजी-आजोबांना काय हवे-नको यांची यादी करणे, त्यांच्या आरोग्यविषयक काही तक्रारी असतील, तर त्यांचे निरसन करणे अशी कामे त्या करीत असत. काळ पुढे सरकत होता. एप्रिल २०१६ मध्ये वहिनी आजारी पडल्या, तेव्हा त्यांनी सुचेता यांना बोलवून स्वयंपाकघर सांभाळण्यास सांगितले. तेव्हापासून सुचेता तेथील स्वयंपाकघर सांभाळू लागल्या. आठवडय़ाचा मेनू ठरवणे, किराणा यादी करून सामान मागविणे, आठवडय़ाला लागणारी भाजी मागवणे, आजी-आजोबांची आवड, त्यांच्या इच्छा सांभाळताना त्यांच्या आरोग्याला बाधा न आणणारे पदार्थ तयार करण्यासाठी त्या पुढाकार घेऊ लागल्या. याशिवाय येणाऱ्या देगणीच्या अर्थकारणानुसार स्वयंपाकासाठी लागणाऱ्या यादीचे, भाज्यांचे नियोजन करणे आदी कामेही त्यांनी सुरू केली.

सुचेता यांच्याबरोबर मनीषा जटार, नीलिमा रेड्डी आणि कुमुद आठल्ये या सगळ्या जणी मिळून सध्या निवारा येथील स्वयंपाकघर सांभाळत आहेत. तेथील ज्येष्ठांना आरोग्यपूर्ण आहार मिळावा यासाठी निवाराच्या संचालक मंडळाबरोबर या चारही अन्नपूर्णा सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून कार्यरत आहेत.

तेथे पावणेदोनशे ज्येष्ठ नागरिक राहतात, नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला उपवासाचे थालिपीठ आजी-आजोबांना खावेसे वाटले. त्यांनी सुचेता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तसे सुचविताच, त्याचे सुयोग्य नियोजन करीत, सगळ्या आजीआजोबांसाठी आरोग्यपूर्ण अशी थालिपिठे बनवून ज्येष्ठांची इच्छा पूर्ण करण्यात आली. बऱ्याच दिवसांमध्ये झुणका, वरणफळे झाली नाहीत, ती करावीत अशा वेगवेगळ्या इच्छा आजी-आजोबांकडून व्यक्त केल्या जातात. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीला तेथील स्वयंपाकघरातील वेगवेगळ्या कामांच्या वेळेतील दहा कर्मचाऱ्यांचे सहकार्य देखील मोलाचे ठरते. वर्षभराची धान्याची साठवण करण्यापासून मसाल्याचे पदार्थ तयार करणे, त्यांची योग्यप्रकार साठवण करणे, फळांचे प्रमाण अधिक आले, तर त्यांचे जाम तयार करून ठेवणे आदी गोष्टी देखील केल्या जातात.

सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच, गरजेनुसार यापेक्षाही जास्त वेळ त्या या कार्यासाठी देतात. या त्यांच्या कार्यात घरच्यांचा केवळ पाठिंबाच नाही, तर मदत देखील असते. सुचेता यांचे पती नितीन हे नोकरी सांभाळून गरजेनुसार महिन्यातून एकदोनदा काही काळासाठी निवारात येतात आणि या अन्नपूर्णाची काही अडचण असेल, तर त्या सोडवण्यास पुढे सरसावतात.

निवारा हा सुचेता यांच्यासाठी एक परिवारच झाला असून रोज सकाळ झाली की दैनंदिन कामातील आखणीबरोबरच निवारात जाण्याची ओढ आणि तेथील कामांची आखणी होण्यास आपसूकच सुरुवात होते.  ज्येष्ठांच्या जशा गरजा आहेत, तशाच अनाथ मुलांच्या देखील काही गरजा असतात. हे ओळखून सुचेता त्यांच्यासाठी देखील कार्यरत आहेत. या मुलांसाठी मे महिन्यात जुन्या वह्य़ांचे कोरे कागद, तुटक्या पेन्सिली, रबर, क्रेयॉन्सारखे विविध रंग गोळा करतात. दिवाळीत अनाथ मुलांसाठी काही वस्तू, फराळ जमवतात. त्यांच्या कार्यात सहभागी व्हायचे असेल तर ९८२२ २१५९०० या क्रमांकावर संपर्क करून सहभागी होतायेईल.

ज्या समाजाने आपल्याला भरभरून दिले, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, ही सुचेता यांची भावना आहे. अशा प्रकारे कार्य केल्यानंतर रात्रीची सुखाची झोप नक्कीच अनुभवायला मिळते, हा त्यांचा अनुभव आहे.

– श्रीराम ओक

shriram.oak@expressindia.com