बंदीजनांच्या सुधारणेसाठी कार्य करणाऱ्या पीएमआय या स्वयंसेवी संस्थेतर्फे उद्यापासून (शुक्रवार) तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. नगर रस्त्यावरील ज्ञानदीप विद्यापीठ येथे ही परिषद आयोजित केली जाणार असून नाशिक धर्मप्रांतांचे बिशप रेव्ह. लुर्ड्स डॅनिअल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
नगर रस्त्यावरील रामवाडी येथील ज्ञानदीप विद्यापीठ येथे १३ ते १५ मे या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अल्पवयीन मुलांच्या सुधारगृहाचे अधीक्षक शरद कुऱ्हाडे, पुणे धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे, आनंद जोजो, पीएमआयचे राष्ट्रीय समन्वयक रेव्ह. एस. वडकुंपदन, धनम अथीसायम या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत बंदीजनांच्या सुधारणेसाठी कार्य करणारे तीनशे स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने येरवडा येथील खुले कारागृह आणि मनोरुग्णालयाला स्वयंसेवक भेट देणार आहेत, अशी माहिती पीएमआय या संस्थेचे राज्य समन्वयक आणि सेंट पॅट्रीक्स कॅथ्रेडलचे रेक्टर विल्फ्रेड फर्नाडिस यांनी दिली. कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या बंद्याचे पीएमआयकडून पुनर्वसन करण्यात आले आहे. याप्रसंगी बंदी त्यांचे अनुभव कथन करणार आहेत, असेही फर्नाडिस यांनी सांगितले.