पुण्यातील नगर रस्त्यावरील प्रसिद्ध फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडव्याच्या सणानिमित्त खरेदीसाठी गेलेल्या तृतीयपंथी सोनाली यांना रोखण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मॉल प्रशासनाच्या नियमावलीत तसा आदेश असल्याचे मॉलच्या महिला सुरक्षा रक्षकाने आपल्याला सांगितल्याचे सोनाली दळवी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. तसेच या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.


सोनाली म्हणाल्या, मी मित्रासोबत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी फिनिक्स मॉलमध्ये गेले होते. मॉलमध्ये जात असताना प्रवेशद्वाराजवळील महिला सुरक्षारक्षकाने मला पाहताच माझी तपासणी करण्यास टाळाटाळ केली आणि मला थांबण्यास सांगून तिने दुसऱ्या महिला सुरक्षारक्षकाला बोलावून घेतले. त्या महिला सुरक्षारक्षकाने माझी हात न लावता तपासणी करून मला प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण विचारले असता आमच्या मॉल व्यवस्थापन पॉलिसीमध्ये तृतीयपंथाच्या व्यक्तींना प्रवेश न देण्यास सांगितले आहे, असे मला सांगण्यात आले.

या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना सोनाली म्हणाल्या, मला मॉलमध्ये प्रवेश देण्यापासून रोखण्यात आले. याचे मला दुखः झाले असून या पुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पाठपुरावा करणार.

दरम्यान, मॉलचे व्यवस्थापक सी. पी. पोरवाल म्हणाले, आम्हाला तृतीयपंयाबाबत यापूर्वी वाईट अनुभव आले होते. तसेच सुरक्षेसाठीच्या कारणास्तव आम्ही त्यांना थांबवून ठेवले होते. त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता.