21 January 2019

News Flash

व्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले; १६५ टाक्यांची झाली मोठी शस्त्रक्रिया

कंपनीने उपचारांसाठी मदत नाकारल्याने व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

व्हॅक्युम क्लिनरमुळे डोक्याला इजा झालेली महिला.

पिंपरी-चिंचवड : चाकण एमआयडीसी परिसरातील नाणेकरवाडी येथील खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे डोके चुकून व्हॉक्युम क्लिनरमध्ये अडकल्याने तीच्या डोक्यावरील केस कातडीसह उपटले गेले आहेत. या विचित्र अपघातात महिलेच्या डोक्यावर तब्बल १६५ टाक्यांची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सीमा विश्वभंर राठोड (वय २५, रा. नाणेकरवाडी) असे या जखमी परप्रांतीय महिलेचे नाव आहे. ही महिला ओबीएसजी कंपनीत हेल्पर म्हणून काम करते. ८ डिसेंबर रोजी सिमा कंपनीत झाडू मारत असताना शेजारी असलेल्या व्हॅक्युम क्लीनरमधील फॅनच्या हवेने त्यांच्या डोक्याचे केस मशीनमध्ये ओढले गेले. त्यामुळे त्यांचे डोके व्हॅक्युम क्लिनरमध्ये अडकून बसले. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणी नव्हते, अशी माहिती स्वतः सीमा यांनी दिली आहे. काही वेळानंतर त्याठिकाणी नातेवाईक महिला आरडा ओरडा ऐकून धावत आली आणि तिने सिमा यांना कसेबसे बाजूला काढले. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर १६५ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर, सुपरवाईजर आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही कंपनीकडून आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचा आरोप जखमी सीमा राठोड यांनी केला आहे. सीमा या सीटी स्कॅन करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनीत चकरा मारत होत्या. मात्र, कंपनीकडून त्यांना मदत नाकारण्यात आली. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

First Published on January 13, 2018 3:18 pm

Web Title: the vacuum cleaner plucked the hair of the womans head 165 tires large surgery