सध्याच्या कालखंडामध्ये जनता पीडित आणि संतप्त असून लोकांना मार्ग सापडत नाही. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेचे आत्मबल वाढविण्याचे काम पत्रकारितेने करावे, अशी अपेक्षा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी व्यक्त केली.
पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळातर्फे विनोद तावडे यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या औरंगाबाद आवृत्तीचे मुख्य वार्ताहर संजीव उन्हाळे यांना वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लोकसत्ता’ च्या फीचर एडिटर आरती कदम आणि श्रीरामपूर येथील वार्ताहर अशोक तुपे यांच्यासह ‘एबीपी माझा’चे वार्ताहर नीलेश खरे यांना आश्वासक पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, मंडळाचे प्रा. विलास जोशी, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. सतीश देसाई या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले,‘‘माध्यमे ‘टीआरपी’साठी आणि राजकीय नेते केवळ मतदारसंघासाठी काम करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशाचा आणि राज्याचा विकास हे उद्दिष्ट बाजूला पडले आहे. त्यामुळे जनतेचे आत्मबल वाढविण्याची अपेक्षा केवळ पत्रकारितेकडून पूर्ण होऊ शकेल. लोकांचे आत्मबल वाढल्यानंतर सर्व यंत्रणा आपोआप कार्यक्षम होतील आणि परस्पर विश्वास वाढल्यानंतर सध्याचे नकारात्मक चित्र दूर होऊ शकेल.’’
सुरेश द्वादशीवार म्हणाले,‘‘कौटुंबिक िहसाचार कायद्याच्या धर्तीवर पत्रकारितेतील गुणवत्तेची मुस्कटदाबी रोखण्यासाठीचा कायदा करण्याची गरज आहे. सामान्य माणूस हाच खऱ्या पत्रकारितेचा आधार आहे, तोपर्यंत पत्रकारिता निर्भयपणे करता येणे शक्य आहे. आपली विश्वासार्हता टिकविणे हे आता पत्रकारांच्याही हाती राहिलेले नाही. त्यामुळे आता टिळक आणि आगरकर जन्माला येतील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.’’
महिला आणि वाचक म्हणूनही पत्रकारितेमध्ये अधिकाधिक महिलांना सामावून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत आरती कदम यांनी व्यक्त केले. अशोक तुपे यांनी पुरस्काराची रक्कम दुष्काळ निर्मूलन कामाला देण्याचे जाहीर केले. प्रा. विलास जोशी यांनी प्रास्ताविक केले. आनंद सराफ यांनी आभार मानले. डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले.