चाऱ्यासाठी भटकत असलेली एक गाय चरता चरता एका चेंबरमध्ये पडली. यामध्ये ती पूर्णपणे अडकली आणि बाहेर पडण्यासाठी तिची धडपड सुरु होती. हे एका तरुणाने पाहिले आणि चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याने तिला सुखरुपपणे बाहेरही काढले. समीर वीर असे या तरुणाचे नाव आहे.

शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास परिसरातील स्मशानभूमीच्या परिसरात ही गाय चरत होती. चेंबरवर असलेले गवत खात असताना चेंबरवर झाकण नसल्याने ती अचानक चेंबरमध्ये पडली. चेंबर खोल असल्याने धडपड करूनदेखील तीला बाहेर येता येत नव्हते. गायीचे केवळ डोकेच चेंबरच्यावर दिसत होते. त्यानंतर दीड तासांनी या ठिकाणाहून जाणाऱ्या समीर वीर या अवलीयाने हे दृश्य पाहिले आणि गायीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिल्यांदा स्वतः पुढे येऊन गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याने केला. परंतु, त्याला एकट्याने हे जमेना, त्यामुळे त्याने आपल्या सात ते आठ मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनाही गायीला बाहेर काढणे जमेना. शेवटी जेसीबीच्या साह्याने या चेंबरच्या बाजूची जमीन खोदून गायीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तब्बल चार तास हे प्रयत्न सुरु होते.

समीर वीर, विकास लांडगे, अमोल वीर, किरण रजपुत, अमित भोसले, हनी थोरात, अक्षय वीर, आकाश लांडगे, वैभव वाल्हेकर, दिपक वीर, मयूर लांडगे, सौरभ लांडगे या तरुणांनी गायीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

गेल्या वर्षी देखील अशाच प्रकारे भोसरी येथे चाऱ्याच्या शोधातील एक गाय पवना नदीच्या पात्रात पडली होती. त्यावेळी देखील याच तरुणांनी पुढाकार घेऊन दोरीच्या साहाय्याने गायीला बाहेर काढले होते. त्यामुळे या तरुणांना पुन्हा एकदा मुक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती दाखवल्याने ही बाब चर्चेचा विषय झाली आहे.