पुणे म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’, विद्वानांचे शहर..!  मात्र, पुण्याची

एवढीच ओळख नाही. भारतातील प्रायोगिक रंगभूमीला समृद्ध करण्याचे काम पुण्याने केले आहे. मराठी रंगभूमीची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घ्यायला लावणाऱ्यांमध्ये ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ हे महत्त्वाचं नाव. गाजलेल्या ‘घाशीराम कोतवाल’या नाटकाच्या वादातून सुरू झालेली ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ ही संस्था म्हणजे रंगभूमीवरचा ‘ब्रँड’च आहे. गेली चाळीस वर्ष हे नाणं खणखणीत वाजतं आहे.

विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक १९७२ मध्ये राज्य नाटय़ स्पध्रेच्या माध्यमातून रंगभूमीवर आले. डॉ. जब्बार पटेल यांनी त्याचं दिग्दर्शन, पं. भास्कर चंदावरकर यांनी संगीत आणि कृष्णदेव मुळगुंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, नंदू पोळ, श्रीराम रानडे, रवींद्र साठे, मोहन गोखले, सतीश आळेकर असे अनेक कलाकार ‘घाशीराम कोतवाल’मध्ये होते. राज्य नाटय़ स्पध्रेच्या प्राथमिक आणि अंतिम अशा दोन्ही फेऱ्यांमध्ये या नाटकाला द्वितीय पारितोषिक मिळालं. मात्र त्यानंतर काही काळाने हे नाटक म्हणजे नाना फडणविसांचे चारित्र्यहनन आहे, समस्त ब्राह्मणवर्गाची बदनामी केलेली आहे, असा सूर पुण्यात उमटू लागला. त्यातून ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ वर दबाव निर्माण करण्यात आला. नाटकाचे प्रयोग थांबवावे लागले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. भालबा केळकर यांनी नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे संस्थेत जुनी पिढी आणि नवी पिढी असा वाद उभा राहिला. परिणामी पी. डी. ए. फुटली आणि २७ मार्च १९७३ रोजी (जागतिक रंगभूमी दिन) ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नव्या नाटय़संस्थेचा जन्म सतीश आळेकर यांच्या शनिवार पेठेतील घराच्या गच्चीवर झाला. कुठल्याही दबावाला बळी न पडता नाटय़वेडानं पछाडलेल्या तरुण रंगकर्मीनी नाटकाचे प्रयोग पुढे सुरूच ठेवले. १९८० मध्ये या नाटकाचे युरोपातही प्रयोग झाले. या दौऱ्याला जाण्यावरूनही नाटकाला तीव्र विरोध झाला होता. त्या विरोधालाही न जुमानता राजकीय स्तरावरून झालेल्या सहकार्यातून नाटकाचा दौरा यशस्वीरीत्या पूर्ण झाला. नाटकाला परदेशी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. कालांतराने हे नाटक मराठी रंगभूमीवरच नाही, तर भारतीय रंगभूमीच्या संदर्भात मलाचा दगड ठरले. ‘घाशीराम’मुळे ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’चे नाव जगभरात पोहोचले. थिएटर अ‍ॅकॅडमीमुळे महाराष्ट्रातील तरुण रंगकर्मीना बळ मिळाले आणि अनेक नाटय़संस्था उभ्या राहिल्या. या नाटय़संस्थांच्या माध्यमातून अनेक नाटकेसादर झाली.

‘घाशीराम कोतवाल’या पहिल्याच नाटकाने थिएटर अ‍ॅकॅडमीची भारतभरातील नाटय़सृष्टीत चर्चा सुरू झाली. या नाटकाबरोबरच थिएटर अ‍ॅकॅडमीनं तीन पशाचा तमाशा, महापूर, महानिर्वाण, बेगम बर्वे, पडघम, अतिरेकी, मिकी आणि मेमसाहेब, प्रलय, डॉल हाऊस अशी नाटके सादर केली. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवर आधारित बदकांचं गुपित, पु. शि. रेगे यांच्या साहित्यकृतींवर आधारित आनंद भाविनी असे साहित्यावर आधारित दर्जेदार संगीत- रंगमंचीय कार्यक्रमही केले. ‘घाशीराम कोतवाल’नंतर सतीश आळेकर यांनी लिहिलेली बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर ही तिन्ही नाटके प्रचंड गाजली. या नाटकांनी आळेकरांची महत्त्वाचे आधुनिक नाटककार ही ओळख निर्माण झाली आणि पुन्हा एकदा थिएटर अ‍ॅकॅडमी आणि पर्यायाने मराठी नाटकाचा भारतीय रंगभूमीवर गौरव झाला. ‘तीन पशाचा तमाशा’ या नाटकाद्वारे नव्या धाटणीची संगीतिका मराठी रंगभूमीला मिळाली. पारंपरिक संगीत नाटकापेक्षा वेगळा आणि आधुनिक संगीत-नाटय़ानुभव प्रेक्षकांना मिळाला. पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाटकात संगीत नाटकाची नवी व्याख्या मांडली गेली असेही म्हणता येईल. थिएटर अ‍ॅकॅडमीनं केवळ नाटके केली नाहीत तर नाटकाची पारंपरिक चौकट मोडणारे, रंगभूमीला नवे आयाम देणारे प्रयोग केले. या प्रयोगातूनच नाटक आणि नाटय़चळवळ बळकट झाली. या संस्थेतून डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, रवींद्र साठे, मोहन गोखले, नंदू पोळ, प्रसाद पुरंदरे, श्रीरंग गोडबोले, माधुरी पुरंदरे, आनंद मोडक, अतुल पेठे असे कितीतरी कलावंत-रंगकर्मी मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीला मिळाले. आज हे कलावंत म्हणजे स्वतंत्र ‘ब्रँड’आहेत असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. थिएटर अ‍ॅकॅडमीचं वैशिष्टय़ म्हणजे, एकाच संस्थेतील कलावंतांचा संच हरहुन्नरी होता. एकाचवेळी संस्थेत अभिनेते, गायक, संगीतकार, लेखक, दिग्दर्शक, पडद्यामागील कलावंत होते. प्रत्येकाकडे संयोजन कौशल्य होतं. या सगळ्यामुळे संस्थेला कोणतेही आव्हान घेताना विचार करावा लागला नाही. अर्थात, हा इतिहास झाला. त्या पलीकडे जाऊन विचार करायचा, तर महत्त्वाची नाटकेरंगभूमीवर आणण्यापुरतेच थिएटर अ‍ॅकॅडमीचे काम मर्यादित नाही. काळाची पावले ओळखून संस्था नाटक आणि सकल ललित कलांचा विचार करत आहे. त्याची सुरुवात झाली ‘रंगसंगीत’ या संगीत एकांकिका स्पध्रेपासून. खरेतर संगीत नाटक हे महाराष्ट्राचे वैशिष्टय़. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठी संगीत रंगभूमीला मरगळ आली. ‘तीन पशाचा तमाशा’ नंतर नव्या धाटणीचे संगीत नाटक रंगभूमीला मिळालेच नाही. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी आणि नव्या काळाची, आजच्या तरुणाईची भाषा बोलणारी संगीत नाटके घडण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आणि अवघ्या महाराष्ट्रातून या स्पध्रेला भरघोस प्रतिसाद मिळू लागला.  संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘ललित कला संकुल’. भारतात एवढी वर्षे नाटय़संस्था आणि नाटकांचा इतिहास सांगितला जातो. मात्र, एकाही संस्थेचे स्वत:चे नाटय़गृह नाही. ही उणीव भरून काढण्याचं काम थिएटर अ‍ॅकॅडमी करत आहे. पुण्यात गुलटेकडी येथे संस्थेचे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे ललित कला संकुल साकारत आहे. यात नाटय़गृह, खुला मंच, प्रदर्शनांसाठी गॅलरीही साकारणार आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे संस्थेविषयी सांगतात, ‘संस्थेने पूर्वी केलेली नाटके नक्कीच महत्त्वाची आहेत. मात्र या नाटकांचे स्मरणरंजन करत बसण्यात अर्थ नाही. आज प्रायोगिक नाटक संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यामुळे सकल ललित कला एका व्यासपीठावर येण्याची गरज आहे. नव्या शक्यतांचा विचार करण्याची वेळ आली आहे. एखाद्या संस्थेनं एकाच कलेसाठी काम करत राहणं हे आजच्या काळात अव्यावहारिक आहे. यशापयशाचा विचार करण्यापेक्षा शक्य तितके प्रयत्न करणं, सकारात्मक विचार करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. रंगसंगीत एकांकिका स्पर्धा आणि ललित कला संकुलाची कल्पना याच विचारातून प्रत्यक्षात आली आहे.’

बऱ्याच वर्षांत संस्थेने स्वत:ची नाटकाची निर्मिती केलेली नाही. याचे शल्य संस्थेतील प्रत्येकाच्या मनात आहे. अर्थात ही कसरही लवकरच भरून निघणार आहे. कारण नव्या नाटय़गृहाची पहिली तिसरी घंटा संस्थेच्याच नव्या नाटकाला वाजणार आहे.

चिन्मय पाटणकर