News Flash

करोना प्रादुर्भावामुळे बालनाटय़ांची टाळेबंदी!

जतनीकरणाअभावी बालप्रेक्षक आनंदापासून वंचित

‘ढब्बू ढोल रिमोट गोल’ या बालनाटय़ात प्रकाश पारखी आणि हर्षदा टिल्लूं

जतनीकरणाअभावी बालप्रेक्षक आनंदापासून वंचित

विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता

पुणे : करोना प्रादुर्भावामुळे बालनाटय़ांची टाळेबंदी झाली असून बालनाटय़ांच्या जतनीकरणाअभावी पडद्यावर किंवा मोबाइलमध्ये बालनाटय़ अनुभवण्याच्या आनंदापासून बालप्रेक्षक वंचित राहिले आहेत. नाटय़संस्थांकडे काही नाटकांचे चित्रीकरण असले तरी ते तांत्रिकदृष्टय़ा उत्तम नसल्याने ही नाटके ऑनलाइन माध्यमातून दाखविण्यासाठी मर्यादा येत आहेत.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी मार्चअखेरीस टाळेबंदी लागू करण्यात आली होती. जवळपास तीन महिने नाटय़गृहे बंद असल्याने मुलांसाठी बालनाटय़ांचे प्रयोग होऊ शकले नव्हते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये बालनाटय़ांचे प्रयोग पाहण्यापासून बाळगोपाळ दूरच राहिले. तर करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने एक एप्रिलपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे नाटय़गृहे बंद आहेत. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येही बालचमूंना बालनाटय़ांचा आनंद घेता येत नाही. ही परिस्थिती एकीकडे असली तरी चित्रीकरण करून बालनाटय़ांचे जतनीकरण करण्याचे प्रयत्न फारसे झालेले नसल्याने घरबसल्या बालनाटय़ांचा आनंद घेण्यापासून बालप्रेक्षक वंचित राहिले आहेत. रंगभूमीला नवे कलाकार देणारी बालरंगभूमी चळवळ सध्या तरी ऑनलाइन नाटय़प्रशिक्षणाचा अपवाद वगळता पूर्णपणे थांबली असल्याचे चित्र दिसत आहे.

नाटय़संस्कार कला अकादमीचे विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, नाटकाचा आनंद रंगभूमीवर प्रत्यक्ष पाहण्यामध्ये आहे. बालनाटय़ या विषयाकडे दुर्लक्ष झालेले दिसते हे वास्तव नाकारता येत नाही. आमच्या संस्थेची ‘ढब्बू ढोल रिमोट गोल’, ‘आजोबांच्या धम्माल गोष्टी’, ‘आई शप्पथ’, गदिमा यांच्या बालपणातील चरित्रावर आधारित ‘नाच रे मोरा’ ही बालनाटय़े आणि ‘भित्रा राजपुत्र’ व ‘बिनकपडय़ाचा राजा’ या बालनाटिका डीव्हीडी स्वरूपात चित्रीकरण केलेल्या आहेत. पण, ती पाहताना मजा येत नाही. मुलांसाठी आम्ही या डीव्हीडी दाखविण्याचा प्रयत्न करू.

महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले म्हणाल्या, करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून ग्रीप्स नाटय़महोत्सव होऊ शकला नाही. ऑनलाइन व्यासपीठावर दाखविता येतील इतके बालनाटय़ांचे चित्रीकरण तांत्रिकदृष्टय़ा उत्तम नाही. आम्ही जतनीकरण करण्यासाठी दहा-बारा नाटकांचे चित्रीकरण केले आहे. नाटक नाटय़गृहामध्ये पाहण्याची मजा येते ती पडद्यावर पाहताना येत नाही. सध्या तरी ही नाटके दाखविण्याचा प्रयत्न केला नाही. यंदा नवीन नाटक बसविण्याचे काम सुरू केले होते. पण, टाळेबंदीमुळे ते ठप्प झाले. ‘डू अँड मी’, ‘आईपण, बाबा पण..’, ‘प्रोजेक्ट अदिती’, ‘एकदा काय झालं’,  ‘तू दोस्त माह्य़ा’ या नाटकांचे चित्रीकरण केले आहे. नाटकातील प्रकाशयोजनेचा परिणाम पडद्यावर पाहताना येत नाही. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे यांच्याशी बोलून बालनाटय़े दाखविण्याचा विचार मनात आहे.

समस्या काय?

*   करोना प्रादुर्भावामुळे नाटय़गृहे बंद असल्याने बालनाटय़ाचे प्रयोग थांबले.

* ऑनलाइन प्रशिक्षण वगळता नाटय़संस्थांच्या नाटय़विषयक उपक्रमांना खिळ बसली आहे.

* बालनाटय़ांचे चित्रीकरण तांत्रिकदृष्टय़ा उच्च दर्जाचे नसल्याने ते ऑनलाइन माध्यमाद्वारे दाखविणे अवघड आहे.

* अशी परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज कोणालाच नसल्याने जतनीकरणापेक्षा संस्थांनी बालनाटय़ांचे प्रयोग करण्यावरच लक्ष केंद्रीत केले.

नाटय़प्रयोग होऊ शकली नसले तरी नाटय़संस्कार कला अकादमीने सहा ऑनलाइन शिबिरांद्वारे नाटय़प्रशिक्षण घेतले. आतापर्यंत माझी शिबिरे पुण्यामध्येच होती. आता ऑनलाइन शिबिरांमध्ये भारतभरातून मुले सहभागी झाली. हा फायदा नक्की झाला.

– प्रकाश पारखी, प्रमुख विश्वस्त, नाटय़संस्कार कला अकादमी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:11 am

Web Title: theatre workshop for kids close due to lockdown zws 70
Next Stories
1 म्युकरमायकोसिसवरील उपचारांसंदर्भात पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय!
2 CCTV Video: पुण्यातील गुरुवार पेठेतील मंदिरातून चोरट्यांनी दानपेटीसहीत १.५३ लाख केले लंपास
3 कृष्णा खोऱ्यातील पाणीपट्टी वसुली उद्दिष्टापेक्षा अधिक
Just Now!
X