पिंपरी-चिंचवड परिसरातील वाकड परिसरात दोन अज्ञात चोरांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. अज्ञातांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे एटीएममधील तब्बल आठ लाख रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मध्यरात्री वाकड परिसरात घडली. संबंधित एटीएमम हे अॅक्सिस बँकेचे असून याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात वाकड परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएममध्ये प्रवेश करताच चोरांनी सीसीटीव्हीची दिशा बदलली. एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करत असताना अचानक भडका झाला आणि एटीममध्ये आगसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. आगीत एटीएममधील आठ लाख रुपये जळून खाक झाले आहेत अशी माहिती संबंधित बँकेकडून देण्यात आली आहे. आग मोठी असल्याने चोरांना इजा झाल्याची शक्यता वर्तवली जात असून दोघांचा शोध वाकड पोलीस घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 3:21 pm