घरात कोण नसल्याची संधी साधत चोरट्यांनी लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष उषा चौधरी यांच्या घरी ३५ तोळे सोन्यासह इतर वस्तू असा १२ लाख ९२ हजार रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. चोरट्यांनी सीसीटीव्हीचीही तोडफोड केली. चौधरी कुटुंबासह पुण्याला गेले होते. तेव्हा त्यांच्या बंगल्यात खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून चोरट्यानी आत प्रवेश केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी चौधरी कुटुंब हे पुण्याला गेले होते. दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊच्या दरम्यान नऊ जणांच्या टोळक्याने चौधरी यांच्या मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या बंगल्यातील खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ३५ तोळे सोने, रोख रक्कम चार लाख रुपये तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्याची फिर्याद उषा चौधरी यांनी लोणावळा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी संशयित नऊ जणांविरोधात लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

चारेट्यांनी मंगळसूत्र, पाटल्या, कर्णफुले, बांगड्या आणि नेकलेस याच्यावर हात साफ केला आहे. त्याचबरोबर रोख रक्कम चार लाख रुपयांचाही समावेश आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत.