मटणाचे दुकान चालवण्यासाठी शेळ्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भोसरी पोलिसांनी दोन साथीदारांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक कार असा एकुण ६ लाख ३६ हजार रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. अल्तमश  कुरेशी (वय- १८) असे मुख्य आरोपीचे नाव असून, सोमेश तायड (वय-१९), रोहन रिठे (वय-२०) सर्व राहणार खडकी बाजार अशी दोन्ही साथीदारांची नावं आहेत. दोन्ही आरोपी महाविद्यालीयन विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अल्तमशचे कासारवाडी येथे मटणाचे दुकान आहे. तो अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतो. परंतु , तो एक सराईत गुन्हेगार असून त्याने मोटार आणि दुचाकी चोरलेल्या आहेत. अनेक ठिकाणी चोरी करताना तो मोटारीत शेळ्या चोरून आणत, त्याच्यामार्फत वेगवेगळ्या पाच पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. दरम्यान, साथीदार सोमेश आणि रोहन यांच्यासह तो नाशिक फाटा इथे चोरीची मोटार विक्रीसाठी आल्याची माहिती समीर रासकर या पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता १० शेळ्या, दोन दुचाकी आणि एक तवेरा मोटार चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरलेल्या शेळ्या अल्तमशच्या मटणाच्या दुकानात नेऊन हलाल करत आणि तेच मटण ग्राहकांना विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कामगिरी भोसरी पोलिसांनी केली आहे.