राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे ‘थीम कॅलेंडर’ प्रसिद्ध

राज कपूर-नर्गिस, दिलीप कुमार-वैजयंतीमाला, गुरुदत्त-वहिदा रहमान, राजेश खन्ना-शर्मिला टागोर, कमल हसन-श्रीदेवी.. रुपेरी पडदा गाजवलेल्या या आणि अशा अनेक जोडय़ांची नावे घेताच त्यांच्या चित्रपटांच्या आठवणींमध्ये रमून जाणारे चित्रपट रसिक थोडे नाहीत! भारतीय चित्रपट सृष्टीतील अशा सर्व गाजलेल्या जोडय़ांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी एका विशेष दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे ती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने!

कोणतीही एक विशिष्ट संकल्पना ठरवून त्यावर आधारित दिनदर्शिका तयार करण्याचा उपक्रम मागील वर्षीपासून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून हाती घेण्यात आला आहे. मागील वर्षी ‘नृत्य’ या संकल्पनेवर तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेला रसिकांकडून वाहवा मिळाली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी भारतीय चित्रपटातील गाजलेल्या नायक-नायिकेच्या जोडय़ांना ‘सिनेमॅटिक पेअर्स’ या दिनदर्शिकेमध्ये स्थान देण्यात आले आहे. १९३० ते ८० अशा ५० वर्षांच्या कालखंडातील हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्ये तयार झालेल्या चित्रपटांच्या लोकप्रिय जोडय़ांची छायाचित्रे या दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम म्हणाले, की हिंदी, मराठी, तेलुगू, बंगाली, कन्नड, मल्याळम, तमिळ आणि गुजराथी चित्रपट सृष्टीतील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या जोडय़ांची निवड आम्ही दिनदर्शिकेसाठी केली आहे. भारतीय चित्रपटांतील प्रेमाचे विविध रंग उलगडणारी कृष्णधवल छायाचित्रे या दिनदर्शिकेसाठी निवडण्यात आली आहेत. मगदूम पुढे म्हणाले, रसिकांचे प्रेम लाभलेल्या जोडय़ा अनेक आहेत. म्हणूनच १२ जोडय़ा निवडणे ही आमच्यासाठी कसोटी होती. त्यामुळेच भारतीय भाषांमधील २४ जोडय़ा निवडून या कसोटीला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. चित्रपट रसिकांना संग्राह्य़ ठेवता येईल अशी या दिनदर्शिकेची निर्मिती केली असून संग्रहालयात, विविध चित्रपट महोत्सवांमध्ये ती रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. यंदा प्रथमच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या संकेतस्थळावर ही दिनदर्शिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे मगदूम यांनी सांगितले. चित्रपट रसिकांच्या मनात अढळ स्थान लाभलेल्या ‘मुघल-ए-आझम’च्या सलीम-अनारकली अर्थात दिलीपकुमार-मधुबाला या जोडीचे छायाचित्र दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर ‘लोगो’ प्रमाणे वापरण्यात आले आहे. मराठीतील लोकप्रिय दादा कोंडके-उषा चव्हाण आणि सूर्यकांत-जयश्री गडकर या जोडीने या दिनदर्शिकेमध्ये स्थान मिळविले आहे. तमिळ चित्रपटसृष्टीवर कायमचा ठसा उमटविलेल्या आणि पुढे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजविलेल्या जयललिता यांचे चित्रपटातील सहनायक एम. जी. रामचंद्रन यांच्यासोबतचे छायाचित्रही या दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट केले आहे.