* आवाजी मतदानाची पद्धत चुकीची असल्याचे राज यांचे मत
उध्दव ठाकरेंसोबतची कालची भेट भक्त बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्तच होती. अशा कौटुंबिक भेटीगाठींचा राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. भावांचा आणि भावनांचा हे दोन्ही वेगवेगळे विषय असून भावनांच्या व्यासपीठावर राजकीय विषय होत नाहीत हे समजून घ्यायला हवे, असेही राज पुढे म्हणाले. काही कारणास्तव मागील वर्षी स्मृतिस्थळावर उपस्थित राहता आले नाही. मात्र, यावेळी शक्य झाले त्यामुळे शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. यामागे कोणतेही राजकीय कारण नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.  राज यांनी विश्वासदर्शक ठरावावेळीच्या भाजपच्या भूमिकेवर देखील यावेळी टीका केली. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठरावावार आवाजी मतदान घेण्याची पद्धतच चुकीचे असल्याचे निरीक्षण राज यांनी यावेळी नोंदविले. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने मतदान घ्यायला हवे होते. सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी कोण, विरोधक हेच समजत नाही. त्यामुळे सध्या राजकीय गोंधळाची स्थिती निर्माण झाली असल्याचे राज म्हणाले. तसेच गोंधळाच्या स्थितीमुळे राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत देण्याच्या शरद पवार यांच्या विधानावर बोलणे देखील राज यांनी टाळले.
शिवसेनेच्या भूमिकेबाबत राज यांना विचारले असता, सत्तेत सहभागी होण्याचा अथवा बाहेर राहण्याचा निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे. कोणी कोणता निर्णय घ्यावा हे मला सांगता येणार नाही, असे ते म्हणाले. दरम्या, झालेल्या चुका सुधारून कामाला लागू आणि पक्षात संघटनात्मक पातळीवर बदल करण्याचे संकेत राज यांनी यावेळी दिले.