22 April 2019

News Flash

नाराजी व्यक्त करण्यास हरकत नाही; पण सार्वजनिक नको – अशोक चव्हाण

जनसंघर्ष सभेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण

पुणे : निवडणुकीसाठी पक्षात अनेक जण इच्छुक असतात. उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय पक्ष घेतो. उमेदवारी मिळाली नाही तर नाराजी असू शकते. ती व्यक्त करण्यास हरकत नाही. मात्र सार्वजनिक पातळीवर बोलणे टाळले पाहिजे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पुण्यातील उमेदवारांच्या नावावरून सुरू झालेल्या वादावर भाष्य केले.

जनसंघर्ष सभेच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेतली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि महापालिकेतील गटनेता अरविंद शिंदे या तिघांच्या नावांची शिफारस प्रदेश काँग्रेसकडे केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीसाठी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह अनंत गाडगीळही इच्छुक होते. शिवरकर यांचे नाव वगळण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावर जाहीर टीका केली होती.

या पाश्र्वभूमीवर बोलताना चव्हाण म्हणाले, की प्रदेश पातळीवर निर्णय घेऊन तिघांची नावे केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. त्याबाबत नाराजी असू शकते. मात्र पक्षात लोकशाही आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर तक्रार करण्यास हरकत नाही.

काकडेंच्या उमेदवारीचा प्रश्नच नाही

राज्यसभेतील खासदार संजय काकडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांना पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या काँग्रेसमध्ये आहे.यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, काकडे काँग्रेसचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षात प्रवेश दिल्यानंतर उमेदवारी देणार का, अशा जर-तरच्या गोष्टींना कोणताही अर्थ नाही.

First Published on February 9, 2019 2:55 am

Web Title: there is no problem for expressing anger ashok chavan