महापालिकेच्या मुख्य सभेत आयुक्तांचा निषेध करण्यासाठी जे आंदोलन आम्ही केले त्याबद्दल माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि केलेल्या आंदोलनाबद्दल आम्हाला पश्चात्तापही नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेता वसंत मोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.
मनसेने माफी मागितल्याशिवाय कोणत्याही बैठकीत वा मुख्य सभेत उपस्थित न राहण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असून त्यावरील प्रतिक्रिया मनसेच्या नगरसेवकांनी दिली. शहराध्यक्ष बाळा शेडगे, नगरसेवक राजू पवार, नगरसेविका रूपाली पाटील, नीलम कुलकर्णी, अर्चना कांबळे, अस्मिता शिंदे, पुष्पा कनोजिया यांची या वेळी उपस्थिती होती. नगरसेविका रेश्मा भोसले यांनी मिळकत कराच्या खोटय़ा पावत्या सादर करूनच महापालिकेची निवडणूक लढवली आणि यासंबंधी आयुक्तांकडून दिली जात असलेली माहिती अर्धवट आहे. मुळातच त्यांनी कर भरल्याची पावती २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री कशी तयार झाली, याचा खुलासा आयुक्तांनी द्यावा, अशी मागणी मोरे यांनी या वेळी केली.
मनसेने दिलगिरी व्यक्त करण्याचा किंवा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट जे केले त्यावर आम्ही ठाम आहोत आणि अधिकारी बहिष्काराचे आंदोलन करणार असतील, तर त्यांच्याही विरोधात कायदेशीरदृष्टय़ा काय करता येईल तेही आम्ही तपासत आहोत, असेही त्यांनी सांगितले. आमच्या एखाद्या आंदोलनामुळे पुणेकरांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या, तर एकदा नाही, दहा वेळा पुणेकरांची माफी मागितली असती; पण या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांना काही वाटले असेल तर त्याचा विचार आम्ही करणार नाही. नाहीतरी अधिकारी मुख्य सभेत येऊन काहीही काम करत नाहीत. त्यामुळे ते आले नाहीत, तरी काही बिघडत नाही, असेही मोरे म्हणाले.
आता माघार घेणार नाही; अधिकारी बहिष्कारावर ठाम
मनसेने केलेल्या आंदोलनामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असा ठाम पवित्रा घेतला असून मनसेच्या नगरसेवकांनी माफी मागावी आणि आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशा मागण्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन केल्या आहेत. दरम्यान, बुधवारच्या मुख्य सभेवरही अधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्यामुळे अधिकाऱ्यांच्या सर्व खुच्र्या रिकाम्याच राहिल्या.
मनसेने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी बुधवारी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी महापालिका भवनासमोरील हिरवळीवर सभा घेतली. आयुक्त महेश पाठक, सर्व कामगार संघांच्या अध्यक्षा मुक्ता मनोहर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ज्यांनी आयुक्तांचा अपमान केला, त्यांनी आयुक्तांची माफी मागावी, तसेच मुख्य सभेत गैरवर्तन करणाऱ्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे अशा मुख्य मागण्या असून माफी मागितली जात नाही, तोपर्यंत मुख्य सभा, स्थायी समितीसह सर्व विषय समित्या तसेच क्षेत्रीय कार्यालयांच्या बैठका आदी ठिकाणी उपस्थित न राहण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत मुक्ता मनोहर म्हणाल्या की, कामगार वर्गाला सातत्याने दबावाला तोंड द्यावे लागत आहे. अशा पद्धतीने काम कसे करणार हा प्रश्न आमच्या समोर आहे. राजकीय पक्षांच्या मनासारखे निर्णय व्हावेत, तशी अंमलबजावणी व्हावी यासाठी राजकीय मंडळींकडूनच दबाव आणले जातात आणि कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी केली जाते.
‘आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही, तर ते प्रवृत्तीविरुद्ध आहे. तसेच या आंदोलनामुळे पुणेकरांची गैरसोय झालेली नाही. आम्ही सर्वजण कामावर असून यापुढे मुख्य सभा एक पूर्ण दिवसाची घ्यावी तसेच महापौरांनी पुढाकार घेऊन सर्व सदस्यांसाठी आचारसंहिता तयार करावी,’ अशी मागणी सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी यावेळी केली.