२०१७ पुणे पोलिसांनी चांगली कामगिरी बजावत अनेक गुन्ह्यांवर वचक बसवला. २०१७ हे वर्ष पुणे पोलिसांनी शोध, कारवाई आणि गुन्हेगारांना शिक्षा देणारे वर्ष ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कुख्यात जाफर इराणीला अटक करण्यात आली. तसेच इतर गुन्ह्यांमध्येही महत्त्वाची कारवाई करण्यात आली. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून आली यावर्षी ५ हजार ७४१ तक्रार अर्ज आले. ज्यापैकी १६३ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१६ च्या तुलनेत हे आकडे दुप्पट आहेत अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. आयटी अॅक्ट अंतर्गत ३२५ गुन्हे दाखल झाले ज्यामध्ये एकूण ९७ आरोपींवर कारवाई करण्यात आली. ९७ पैकी ९ आरोपी विदेशी होते अशीही माहिती शुक्ला यांनी दिली.

नार्कोटिक्स अंतर्गत ७२ गुन्हे दाखल झाले. ज्यामध्ये १ कोटी पेक्षा जास्त रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आली. तर १०६ आरोपींना अटक करण्यात आले. २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे पोलिसांनी १ हजार ७७२ किलो अंमली पदार्थ नष्ट केले. मागील २८ वर्षातला हा सर्वात मोठा आकडा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०१७ या वर्षात १९ गँगमधील १२५ गुन्हेगारांवर MCOC अंतर्गत कारवाई करण्यात आली. तर ३० आरोपींवर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली. बलात्काराच्या घटना वाढल्या असून त्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना ही गंभीर बाब आहे.या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने या विषयी काय चूक काय बरोबर हे सांगणे जरुरीचे आहे असे आवाहन रश्मी शुक्ला यांनी केले. तसेच प्रामुख्याने सोसायट्या,शाळा आणि महाविद्यालयामध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

१० खूनाचे गुन्हे,फसवणूक ९६९ गुन्हे,विनयभंगाच्या ६९९ या घटना 2017 मध्ये घडल्या आहेत. एकूण १३ हजार ८८५ गुन्हेगारीच्या घटना घडल्या. ज्यापैकी ८ हजार ९६१ प्रकरणे उघडकीस आली. अशीही माहिती शुक्ला यांनी दिली.