करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी शहरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांनी मूर्तींचे विसर्जन घरीच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे लक्षात घेता आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मोहोळ म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी जवळपास पाच लाख मूर्तींचे विसर्जन होते आणि वीस ते पंचवीस लाख नागरिक त्या दिवशी रस्त्यावर असतात. यंदा करोना सारख्या आजाराचा आपण सामना करीत असून त्याचा प्रादुर्भाव होता कामा नये. यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस अथवा शाडू मातीच्या मूर्ती ऐवजी धातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी कारण अनंत चर्तुदशीला विसर्जन करून परत ही मूर्ती देव्हाऱ्यात ठेवता येऊ शकते. तसेच ज्या नागरिकांना मूर्तीचे दान करायचे असेल त्यांच्यासाठी पुणे महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मूर्ती घरीच विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याने ती लवकरात लवकर विरघळण्यासाठी, महापालिका प्रशासनाकडून सोडियम बायकार्बोनेट मोफत पुरविण्यात येणार असल्याचेही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.