चोरटय़ाकडून लष्करात जवान असल्याची बतावणी

समाजमाध्यमावर दुचाकी विक्रीची जाहिरात देऊन लष्करात जवान असल्याची बतावणी करत चोरटय़ाने युवकाला ६७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.

खडकी भागातील एका युवकाने या बाबत खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन पद्धतीने दुचाकी तसेच अन्य वस्तू खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर स्वस्तात दुचाकी विक्रीची जाहिरात टाकण्यात आली होती. तक्रारदार युवकाने चोरटय़ाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर चोरटय़ाने लष्करात जवान असल्याची बतावणी युवकाकडे केली. लवकरच माझी बदली राजस्थानात होणार असल्याचे त्याने युवकाला सांगितले. त्यानंतर युवकाला दुचाकी खरेदी व्यवहारापोटी पैसे भरण्याबाबत चोरटय़ाने सांगितले.

चोरटय़ाने पेटीएम खात्यात पैसे भरण्यास सांगितल्यानंतर युवकाने एकूण ६७ हजार रुपये जमा केल. दरम्यान, चोरटय़ाने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने तक्रार दिली. पोलीस निरीक्षक शफील पठाण तपास करत आहेत.

राजस्थानातील टोळी सक्रिय; आवाहनाकडे काणाडोळा

संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात तसेच लष्करात जवान असल्याची बतावणी करत राजस्थानातील टोळीने देशभरातील अनेकांना गंडा घातला आहे. या टोळीने पुण्यातील अनेकांची फसवणूक केली आहे. लष्करात जवान असल्याची बतावणी करणाऱ्या टोळीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी वेळोवेळी केले आहे. मात्र, सायबर गुन्हे शाखेने केलेल्या आवाहनाकडे अनेक जण काणाडोळा करत असल्याचे उघडकीस आले आहे. फसवणुकीचे हे सत्र कायम आहे.