महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा करण्यात येणाऱ्या १६ परिमंडलांमध्ये विजेची हानी कमी राखण्यामध्ये पुणे परिमंडल यंदाही अव्वल राहिले आहे. सध्याची वीजहानीची स्थिती पाहता पुणे विभागात केवळ ९.०५ टक्के वीज वितरण हानी दिसून येत असून, दरवर्षी ही वीजहानी काही प्रमाणात कमी होत गेलेली आहे. मागील अनेक वर्षांपासून वीजहानी सर्वात कमी ठेवण्याचे श्रेय पुणे विभागाने मिळविलेले आहे. सध्या वीजचोरांविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या जोरदार मोहिमेमुळे ही हानी आणखी कमी होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रत्यक्ष पुरविलेली वीज व त्याचा मिळालेला मोबदला यात येणारा फरक हा वीज वितरण हानी समजली जाते. महावितरण कंपनीच्या वितरण व्यवस्थेतील गळती व वीजचोरी यामुळे वीजहानी निर्माण होत असते. काही वर्षांपूर्वी महावितरण कंपनीची सरासरी वीजहानी २० टक्क्य़ांहूनही अधिक होती. त्यामुळे ही हानी कमी करण्याबाबत थेट राज्य वीज नियामक आयोगानेच लक्ष घालून महावितरणला तसे आदेश दिले होते. त्या नंतर हानी कमी करण्याबाबत राज्यभर विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले.
मीटर वाचनातील अनियमितता शोधण्यासाठी राज्यभरात महिलांच्या दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे वीजचोरी रोखण्याच्या दृष्टीने राज्यभरात भरारी पथके व सहा स्वतंत्र पोलीस ठाण्यांची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून वीजचोरीच्या विरोधात कठोर भूमिका घेत मोहिमा राबविण्यात आल्या. वीज वितरणातील घट शोधण्यावरही भर देण्यात आला असून, वितरण रोहित्रांना मीटर बसविण्यात आले. त्याचप्रमाणे फिडरवरही मीटर बसविण्यात आले. त्यातून विजेचा हिशेब ठेवणे शक्य झाले.
पुणे विभागातही गळती कमी करणे व वीजजोरी रोखण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. त्याबरोबरच विभागात प्रामाणिकपणे व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोठी असल्याने या ग्राहकांनीही वीजहानी कमी करण्यात मोठा हातभार लावला. मागील वर्षी पुणे विभागाची वीजहानी ९.६१ टक्के होती, ती आता ९.०५ इतकी कमी झाली आहे. पुणे विभागामध्ये सध्या वीजचोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे. त्यातून कोटय़वधींची वीजचोरी उघड होत आहे. प्रत्येक संशयास्पद वीजवापरावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे भविष्यात आणखी वीजचोर हाती लागू शकणार आहेत. त्यामुळे ही वीजहानी आणखी कमी होऊ शकणार आहे.
पुणे विभागापाठोपाठ कल्याण परिमंडलात सर्वात कमी म्हणजे ९.७४ टक्के वीजहानी आहे. राज्यात सर्वाधिक वीजहानी नांदेड परिमंडलात असून, ती २१.४९ टक्के आहे. त्यापाठोपाठ जळगाव, अकोला, औरंगाबाद, अमरावती, लातूर आदी परिमंडलात अद्यापही मोठय़ा प्रमाणावर वीजहानी आहे. महावितरण कंपनीची सरासरी वीजहानी १४.१७ टक्क्य़ांवर आली आहे.
विभागानुसार वीज वितरण हानीची टक्केवारी
पुणे (९.०५), कल्याण (९.७४), नागपूर (१०.८१), नागपूर शहर (१०.८६), चंद्रपूर (११.९८), गोंदिया (११.९८), कोल्हापूर (१२.४४), भांडूप (१४.१०), बारामती (१४.१६), कोकण (१५.५७), नाशिक (१५.९१), अकोला (१६.३५), अमरावती (१६.३५), औरंगाबाद (१६.३९), लातूर (२०.४६), जळगाव (२१.०७), नांदेड (२१.४९).