शहरातील ज्या व्यापाऱ्यांनी आजवर एक रुपयाही स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स-एलबीटी) भरलेला नाही, अशांवरच कारवाई सुरू झाली असून ही कारवाई राज्य शासनाच्या नगर विकास विभागाची परवानगी घेऊनच केली जात असल्याचे महापालिकेतर्फे बुधवारी स्पष्ट करण्यात आले.
शहरात व्यवसाय/व्यापार करणाऱ्या आणि आजवर एलबीटीसाठी नोंदणी न करणाऱ्या तसेच आजवर एकदाही एलबीटीचा भरणा न केलेल्या व्यावसायिकांवर/व्यापाऱ्यांवर सध्या महापालिकेतर्फे कारवाई केली जात आहे. अशा व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये जाऊन तपासणी करण्यात येत असून या कारवाईला व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. तसेच कारवाई बेकायदेशीर असल्याचाही दावा संघटनातर्फे करण्यात आला आहे.
या पाश्र्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप आणि स्थानिक संस्था कर आकारणी प्रमुख, सहायक आयुक्त विलास कानडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की ज्या व्यावसायिकांवर आतापर्यंत कारवाई झालेली आहे त्यांनी एलबीटी चुकवल्याचे दिसून आले आहे. ज्यांनी शंभर टक्के कर बुडवला आहे अशी प्रकरणे शासनाकडे पाठवण्यात आली होती. शासनाच्या नगर विकास विभागाकडून या सर्वावर कारवाईसाठी तसेच दुकानात जाऊन तपासणीसाठी परवानगी मागण्यात आली होती. शासनाने तशी परवानगी दिल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात आली आहे.
कर न भरणाऱ्या व्यावसायिकांमुळेच ही परिस्थिती उद्भवली असून जे व्यावसायिक एलबीटी भरत नाहीत, त्यांनी नोंदणी करून दर महिन्याचा एलबीटी पुढील महिन्याच्या दिनांक २० पूर्वी भरावा, तसेच एलबीटी भरणाऱ्या व्यावसायिकांनी तसा फलक व्यवसायाच्या ठिकाणी ठळकपणे लावावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.