खासदार संभाजी राजे यांनी पुण्यातल्या एका फॅशनबाबत आपलं परखडं मत व्यक्त केलं आहे. ही फॅशन आपल्याला खटकते ती सध्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकत असल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणे सोशियल फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

संभाजी राजे म्हणाले, “माझा परखड बोलण्याचा प्रयत्न असतो. मात्र, यावर काही लोक नाराज होतात. पुण्यातील एक गोष्ट मला नेहमी खटकते. ती आता कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात येत आहे. ती म्हणजे ‘गोल्ड मॅन’. असे ‘गोल्ड मॅन’ पाहिले की मी घाबरून जातो. कारण अंगावर खूपसारं सोनं घालायच, त्यावर सोन्याचं जॅकेट घालायच. मला कळत नाही की हे एवढं सोनं आणायचं कुठून? महिलांनी सोनं घातलं पाहिजे पण माणसं ते का घालतात हेच मला जमजत नाही.”

एक किस्सा सांगताना संभाजी राजे पुढे म्हणाले, “एकदा सात-आठ गोल्ड मॅन माझ्या शेजारी बसले होते आणि मी त्यांच्यामध्ये बसलो होतो. त्यावेळी मी एवढा घाबरून गेलो होतो. मी आमच्याकडे सोनं असून सुद्धा दाखवत नाही आणि सात आठ गोल्ड मॅन माझ्या बाजूला होते. त्यानंतर माझं भाषण सुरू झालं त्यांना वाटलं राजे आमचं कौतुक करतील. मात्र, मी बोलत असताना शालजोडीत मारले. मी म्हटलं तुम्ही पॅन्ट देखील सोन्याची घेतली तरी माझी हरकत नाही. पण, तुमची सामाजीक भावना महत्वाची आहे, असं सांगितलं. पाच कोटींचं सोन घेतलं आणि पाच लाखांची मदत केली तरी खूप आहे, असं मी त्यांना म्हणालो. त्यानंतर एकही गोल्ड मॅन मला पुन्हा त्या व्यसपीठावर दिसला नाही. दरम्यान, तुम्ही कामाने गोल्ड मॅन व्हा, असा मोलाचा सल्लाही यावेळी खासदार संभाजी राजे यांनी उपस्थितांना दिला.

पवार कुटुंबियांवर साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मावळमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी मी श्रीरंग बारणे यांना वारंवार फोन करीत होतो. बारणे म्हणायचे राजे काही काळजी करू नका, पण आमची धाकधूक वाढत होती. कारण, जर का पुढचा उमेदवार निवडून आला असता. तर सामान्य माणसाचा पराभव झाला असता अशी भीती आमच्या मनात होती, अशा शब्दांत त्यांनी पार्थ पवार अर्थात पवार कुटुंबियांना टोला लगावला.