लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने वार्षिक चालू बाजारमूल्य तक्त्याचे (रेडीरेकनर) नवीन दर निश्चित करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यंदा नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवाढ सुचवण्यात आली असून आचारसंहिता सुरू असल्यामुळे या दरात राज्य सरकारकडून कोणताही बदल केला जाणार नाही. परिणामी, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुचवण्यात आल्याप्रमाणे यंदा रेडीरेकनरच्या दरात वाढ होणार आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारने दरवाढ न करता दिलासा दिला होता.

गेल्या वर्षभरात झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत माहिती घेऊ न नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले नसले, तरी महसुलात वाढ झाली आहे. ही बाब विचारात घेऊ न रेडीरेकनरच्या दरात किंचित वाढ केली जाणार आहे, असे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरवर्षी १ एप्रिलपासून रेडीरेकरनचे नवीन दर जाहीर केले जातात. गेल्या वर्षी कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. रेडीरेकनरचे दर निश्चित करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून रेडीरेकनरचे दर निश्चित करण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून त्यामध्ये बदल करण्यात येतो.

यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे राज्य सरकारकडून या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येणार नाही. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही रेडीरेकनरच्या दराबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे यंदा रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

३१ मार्चला कार्यालये खुली ठेवणार?

रेडीरेकनरचे नवे दर १ एप्रिलपासून लागू होत असतात. त्यामुळे ३१ मार्चला दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी होत असते. यंदा ३१ मार्चला रविवार येत आहे. दरवर्षी ३१ मांर्चला राज्यात सरासरी तीन हजार दस्तांची नोंदणी करण्यात येत असते. यंदा दरवाढीच्या शक्यतेने दस्तनोंदणीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊ न ३१ मार्चला दुय्यम निबंधक कार्यालये खुली ठेवली जाण्याची शक्यता आहे.