स.प. महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी हटून बसलेल्या ७७ विद्यार्थ्यांना रिक्त राहिलेल्या जागांवर बुधवारी प्रवेश देण्यात आले असून अनेक विद्यार्थ्यांना नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाले असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक खूश होते. स.प महाविद्यालयाकडूनही विद्यार्थ्यांना शुल्क देण्यात येणार आहे.
स.प. महाविद्यालयाला अकरावीसाठी प्रवेश क्षमता वाढवून न देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून अकरावीला प्रवेश मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांना ज्या महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त आहेत, त्या ठिकाणी प्रवेश देण्यात आले. आबासाहेब गरवारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता प्रवेश प्रक्रिया करण्यात आली. एकूण ७७ विद्यार्थ्यांना २५ महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आले आहेत. विज्ञान शाखेच्या १७, वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमातील ५१, वाणिज्य शाखेच्या मराठी माध्यमातील ७, कला शाखेच्या इंग्रजी माध्यमातील २ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.
एमआयटी, विमलाबाई गरवारे विद्यालय, शाहू कॉलेज, गरवारे कॉलेज, जिजामाता, शिवाजी मराठा विद्यालय अशा महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आल्यामुळे विद्यार्थी आणि पालक खूश आहेत.