News Flash

उच्च शिक्षण अपूर्ण राहिलेल्यांनाही आता पदवी मिळवण्याची संधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून नियमात बदल

(संग्रहित छायाचित्र)

काही ना काही कारणाने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांचे अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करता येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नियमावलीत काही महत्त्वपूर्ण बदल करत जुन्या अभ्यासक्रम, विषयांना समकक्षता दिली असून, त्यानुसार २०१६-१७पूर्वीचे विद्यार्थी आताच्या अभ्यासक्रमाचे विषय घेऊन, त्याची परीक्षा देऊन पदवी मिळवू शकतात.

उच्च शिक्षणात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आर्थिक-कौटुंबिक अशा काही अडचणींमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. संबंधित विद्यार्थ्याला काही वर्षांनी पुन्हा राहिलेले शिक्षण पूर्ण करायची इच्छा झाल्यास तोपर्यंत अभ्यासक्रम बदललेला असतो. त्यामुळे पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची मुभा नसल्याने अनेकांना पदवीपासून वंचित राहावे लागते. मात्र ही उणीव आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दूर केली आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेने जुन्या विद्यार्थ्यांना नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देऊन पदवी मिळवण्याची सुविधा प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नियमांत बदलही करण्यात आला आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, की २०१६-१७ पूर्वीच्या जुन्या पॅटर्नला समकक्षता देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला. परीक्षा व मूल्यमापन विभागाने त्याची कार्यपद्धती ठरवली आहे. त्यानुसार संबंधित जुन्या विद्यार्थ्यांना सध्याच्या अभ्यासक्रमानुसार विषय घेऊन परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांचे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळेल.

नव्या शैक्षणिक धोरणातही तरतूद

सुमारे पाच टक्क्यांच्या आसपास विद्यार्थी शिक्षणातून बाहेर (ड्रॉपआऊट्स) जातात. त्यांना शिक्षण पूर्ण करायची इच्छा असल्यास आता संधी मिळू शकेल. तसेच विद्यार्थ्यांना पदवी पूर्ण केल्याचे मानसिक समाधान, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यही मिळेल. नव्या शैक्षणिक धोरणात ‘मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट’ची तरतूद करण्यात आली आहे. त्या धर्तीवरच जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवाहात येता येईल. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असेही डॉ. काकडे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 12:13 am

Web Title: those who have not completed higher education now have the opportunity to graduate abn 97
Next Stories
1 ससून सर्वोपचार रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांसाठी अत्यल्प खाटा राखीव
2 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाची रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती
3 चिमुकल्याच्या श्वासनलिकेतून काढला काचेचा तुकडा
Just Now!
X