वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांची अपेक्षा

प्रत्येक निवडणूक जात-धर्माच्या आधारावर होणार असेल, तर देशाला भवितव्य नाही. स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे वंचितांच्या आघाडय़ा आणि उमेदवारांच्या जातीची घोषणा करीत आहेत. त्यामुळे सामाजिक जाणिवा प्रगल्भ असलेल्या कार्यकर्त्यांनी लोकशाही टिकविण्यासाठी जाती निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घ्यावा, अशी अपेक्षा वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी रविवारी व्यक्त केली.

पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळातर्फे मालपाणी उद्योगसमूहाचे प्रमुख डॉ. संजय मालपाणी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र टाइम्स’चे दिल्ली येथील वरिष्ठ सहायक संपादक सुनील चावके, ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे मुख्य वार्ताहर विनायक करमरकर, ‘सकाळ’चे लातूर येथील वार्ताहर सुशांत सांगवे आणि ‘न्यूज १८’ वाहिनीचे पुणे ब्युरो चीफ अद्वैत मेहता यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी फुटाणे बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, अंकुश काकडे आणि प्रा. प्रकाश भोंडे या वेळी उपस्थित होते. भिडे यांच्या आठवणींना उजाळा देत करमकर यांनी पुरस्काराची रक्कम बातमीदारी विषयामध्ये प्रावीण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांला पारितोषिक देण्यासाठी पुरस्काराच्या रकमेचा धनादेश यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे सुपूर्द केला.

डेक्कन क्वीनच्या डब्यात वरुणराज भिडे यांच्याकडून विधिमंडळ समालोचन ऐकायला मिळायचे, या आठवणींना उजाळा देत फुटाणे म्हणाले, वृत्तपत्र आणि वाहिन्यांची जागा राजकारणी, अभिनेते आणि क्रिकेटपटूंनी व्यापली आहे. काँग्रेस पक्ष नेत्यांची मुलं सांभाळण्यासाठी लागतो. भाजपकडे अहिरावण—महिरावण वगळता कोणीच नाही. लोकशाहीच्या नावाखाली आपण हुकूमशाही अनुभवतो आहोत. आपण त्या पक्षात नसल्यामुळे आपण बोलू शकतो. गेल्या चार वर्षांत जात आणखी बळकट झाली आहे. गांधी गुजराती नसते तर नोटेवरून गायब झाले असते. इतक्या चित्रविचित्र घटना घडत असताना आपल्याला राग येत नाही. सर्वच पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखे झाले आहेत. पक्षांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत लोकशाही बळकट होणार नाही.

समाजातील चांगुलपणा जागा ठेवण्याचे काम वरुणराज भिडे मित्रमंडळ करत आहे, असे मालपाणी यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या चालू घडामोडी विषयात घनश्याम येणगे आणि सागर बिसेन या प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे या वेळी सन्मानित करण्यात आले.