राज्यशासनाने १६ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगतची १८ गावे महापालिकेत समाविष्ट केली, मात्र, आजही तेथील समस्या सुटू शकलेल्या नाहीत, ‘समस्यांचे माहेरघर’ म्हणून त्या गावांकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत देहू, आळंदी, चाकण,हिंजवडी या मोठय़ा गावांसह २० गावे नव्याने पिंपरीच्या कार्यक्षेत्रात आणण्याचे नियोजन शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे ‘घरचं पडलं थोडं अन् व्याह्य़ाने धाडलं घोडं’ असे चित्र पुढे आले आहे.
राज्य शासनाने ११ सप्टेंबर १९९७ ला चिखली, तळवडे, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, दिघी, दापोडी, बोपखेल, वाकड, पुनवळे, किवळे, मामुर्डी, विकासनगर, रावेत ही गावे पालिकेत समाविष्ट केली. बेटासारखी अवस्था झालेल्या ताथवडे गावाचाही अलीकडेच समावेश झाला. ‘श्रीमंत’ महापालिकेत आल्यानंतर कायापालट होणार, अशी अपेक्षा ठेवलेल्या गावकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. अंतर्गत रस्ते, पाणी, दवाखाने, वाहतूक, पोस्ट ऑफिस यासारख्या आवश्यक सुविधांचा विषय असो, की अन्य प्रकल्पांचा; अपेक्षित विकास झालाच नाही. याविषयी तेथील ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी सुरू आहेत. या गावांमधून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची गेल्या अनेक वर्षांपासून हीच ओरड आहे. अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे वैतागलेल्या नागरिकांनी अनेकदा आंदोलने करून आपला संताप व्यक्त केला आहे. मात्र, त्याचा फारसा फरक पालिका अधिकाऱ्यांवर पडत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. नियोजनाच्या अभावामुळे शहराचा काही भाग अतिविकसित तर नवी गावे अतिदुर्लक्षित दिसून येतात. अवास्तव आरक्षणे टाकणे, शेतकऱ्यांच्या जमिनी अडकवून ठेवणे, शेतकऱ्यांच्या हरकतींना केराची टोपली दाखवणे, विकास आराखडा प्रलंबित ठेवणे, जमिनीच्या दलालांचा सुळसुळाट, विकसित न झालेली आरक्षणे असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावरून आजही राजकारण व अर्थकारण सुरू आहे.
अशा परिस्थितीत देहू, विठ्ठलनगर, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, चाकण, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, आळंदी, खालुंबरे, गहुंजे, िहजवडी, माण, मारूंजी, नेरे, जांबे ही गावे महापालिकेत आणण्याचा विचार राज्यशासनाकडून सुरू आहे. त्यादृष्टीने पालिकेचा अभिप्राय मागवण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच या निर्णयाचे स्वागत व विरोध अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संत तुकोबांचे देहू व माउलींची आळंदी पंचक्रोशीत प्रसिध्द असलेली तीर्थक्षेत्रे आहे. जगाच्या नकाशावर असलेले िहजवडी आयटीचे केंद्र आहे. वेगाने औद्योगिक पट्टा म्हणून विकसित झालेले चाकण आहे. येथील नियोजित विमानतळ शहराच्या प्रवेशद्वाराजवळ येणार आहे. गहुंज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आहे. त्यामुळे हद्दवाढ झाल्यास शहराचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक अर्थाने शहराचे महत्त्व कितीतरीपटीने वाढणार आहे. मात्र, यापूर्वी समाविष्ट झालेल्या गावांचा अनुभव फारसा चांगला नाही. त्यामुळे नव्याने गावे आल्यास त्यांची परिस्थिती काय राहील, त्यांना याच समस्या अनुभवाव्या लागतील का, याविषयीच्या चर्चा गावोगावी झडू लागल्या आहेत.