महिलांना राजकारणामध्ये पन्नास टक्के आरक्षण मिळाले असले तरी अनेक महिला लोकप्रतिनिधी पतीच्या छत्रछायेखाली काम करत आहेत. महिलांना कारभाराची संधी दिल्यानंतरही त्या नाममात्र कारभारी राहत असतील तर हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खंत राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी शनिवारी व्यक्त केली.
जिजामाता महिला सहकारी बँकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला; त्या वेळी सत्यनारायण बोलत होत्या. या वेळी शास्त्रज्ञ वसंता रामास्वामी, क्रीडापटू अंजली वेदपाठक, साहित्यिक वीणा देव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण, भीमथडी जत्रेच्या आयोजक सुनंदा पवार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी बँकेच्या अध्यक्ष स्मिता यादव, उपाध्यक्ष रेखा पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील खेडकर आदी उपस्थित होते.
सत्यानारायण म्हणाल्या की, राजकारणामध्ये महिलांचा सहभाग वाढावा म्हणून पन्नास टक्के आरक्षण करण्यात आले. महिलांना कारभार करण्याची संधीही मिळाली. मात्र, काही महिला पतींनाच कारभार करण्यास सांगतात. सभागृहात बोलल्यानंतर घरी गेल्यावर पतीकडून मारहाण होते, असे काही महिलांनी सांगितले. महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोगाकडून महिला लोकप्रतिनिधींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.