पिंपरी- चिंचवडमधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. काही महिन्यांपूर्वी देखील खच धरणातही अशीच घटना घडली होती. सामाजिक संस्थांमुळे हा प्रकार समोर आला असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार, माशांच्या मृत्यूसाठी कारणीभूत कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

थेरगाव येथील केजुबाई धरणात लाखो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मानवी मैलाचे पाणी सर्रास सोडलं जातं. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी असून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करुनही पवना नदी पत्रातील जलपर्णी ‘जैसे थे’च आहे. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जलपर्णी काढली, मात्र महानगर पालिका याबाबत गंभीर नसल्याचे समोर आले आहे. जलपर्णी असल्याने पाण्यातील माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

केजुबाई येथील धरणात मृत्यू झालेल्या माशांचा खच पडला असून त्यांची संख्या लाखोंच्या घरात आहेत. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पाण्याचे आणि मातीचे नमुने महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.

‘पाण्याचे नमुने घेतले आहेत.त्याचा अहवाल काय येईल ते पाहू, अचानक अशी घटना घडत नाही. गेल्या प्रकरणात प्रदुषण नियंत्रण मंडळाने संबंधितांना नोटिसा पाठवल्या होत्या. पण म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होते.’, असे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.