News Flash

तीन महिने उलटूनही हजारो कर्मचाऱ्यांना निवडणूक कामाचा भत्ता नाही

पुणे जिल्ह्य़ात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत.

पुणे : लोकसभा निवडणूक आणि निकालाची प्रक्रिया पार पडून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्याप निवडणूक कामाला जुंपलेल्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कामाचा भत्ता मिळालेला नाही. पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांसाठी राज्य, केंद्र शासनाच्या विविध विभागांचे तब्बल ४३ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते.

पुणे जिल्ह्य़ात पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. या लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक कामकाजासाठी शहरासह जिल्ह्य़ातील केंद्र, राज्य शासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध कार्यालयांकडून ४३ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते. या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जेवण, प्रवास, निवास यांचा खर्च जागेवर देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अ, ब, क आणि ड श्रेणीनुसार देण्यात   येणारा अतिरिक्त भत्ता अद्याप देण्यात आलेला नाही.

लोकसभा निवडणूक होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही अतिरिक्त भत्ता न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीसाठी अ आणि ब दर्जाचे अधिकारी, तर क आणि ड वर्गातील वेगळे कर्मचारी अशी वर्गवारी करण्यात आली होती. संबंधितांच्या वेतनाप्रमाणे अतिरिक्त भत्ता ठरवण्यात येतो. याबरोबरच लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किती तास काम केले, त्यानुसारही अतिरिक्त भत्ता देण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

प्रशासनाचा दावा काय?

लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामकाजात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांची संगणकीकृत माहिती निवडणूक शाखेकडे उपलब्ध आहे. यामध्ये प्रशिक्षण अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी, उपअधिकारी, विभागीय केंद्र अधिकारी, कर्मचारी, वाहक आणि इतर अशा श्रेणीनुसार कामकाजाची वर्गवारी करत पुण्यातील चारही मतदारसंघात निवडणूक कामकाज केले आहे. त्यानुसार संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मूळ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संबंधितांचे मासिक वेतन किती?, याबाबत माहिती मागवण्यात आली आहे. परंतु, अद्याप बहुतांशी विभागातील अधिकाऱ्यांकडून वेतानाबाबतची माहिती निवडणूक शाखेकडे प्राप्त झालेली नाही. परिणामी पुढील कार्यवाही थांबली आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 4:30 am

Web Title: thousands of employees not got election work allowance zws 70
Next Stories
1 मुस्लीम आडनावामुळे पोलिसांकडून चौकशी?
2 मंडईतील वाहनतळ बंद
3 ग्रामस्थांच्या वादात लोणावळ्यातील लायन्स पॉईंट महिनाभरापासून बंद
Just Now!
X