दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचे अथर्वशीर्ष पठण 

‘ॐ नमस्ते गणपतये! त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि!’.. हजारो महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठण सुरू झाले आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर मंत्रोच्चारणाने शुक्रवारी ऋषिपंचमीच्या पहाटे पवित्र वातावरणाची अनुभूती साऱ्यांनी घेतली. आदिशक्तीच्या विराट स्वरूपाने बुद्धीची देवता असलेल्या गणरायाची अथर्वशीर्ष पठणातून पूजा बांधली.

पहाटे चार वाजल्यापासूनच पारंपरिक पेहराव आणि नथ परिधान केलेल्या महिलांनी उत्सव मंडपामध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची शतकोत्तर रौप्यमहोत्सवपूर्ती आणि अथर्वशीर्ष पठणाच्या उपक्रमाची त्रिदशकपूर्तीचे औचित्य साधून ऋषिपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात ऊर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये महिलांच्या गर्दीचा उच्चांक पहायला मिळाला. फिनोलेक्सच्या रितू छाब्रिया, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पं. वसंत गाडगीळ, एमएनजीएलचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के, ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अरुण भालेराव, शुभांगी भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण या वेळी उपस्थित होते. महाआरती आणि इंधन वाचवाचा संदेश देत महिलांनी जागर केला.

पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे याची प्रचिती परदेशी पाहुण्यांमुळे आली. अथर्वशीर्ष पठणाला सहवास संस्थेच्या माध्यमातून फ्रान्स, इस्रायल, इटली, मेक्सिको, पोलंड, तुर्कस्तानमधील तीसहून अधिक परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली. या पाहुण्यांनी गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम कॅमेऱ्यामध्ये टिपला.