अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील अधिकाऱ्याला धमकाविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्या अधिकाऱ्याकडे पंचवीस लाखांची खंडणीदेखील मागण्यात आली आहे
याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द जिवे मारण्याची धमकी देणे, खंडणी या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय)वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. दोन डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक घोडके यांच्या मोबाईलवर मेसेज आला. हा मेसेज घोडके यांनी वाचला व या मेसेजकडे दुर्लक्ष केले.त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी पोलिस निरीक्षक घोडके यांना पुन्हा एक मेसेज आला. डॉ.दाभोलकर हत्येचा तपास थांबवा,अन्यथा जिवे ठार मारू. पंचवीस लाख रूपये देण्याची मागणीही अज्ञाताने मेसेजद्वारे दिली आहे. पोलिस निरीक्षक घोडके यांना धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे, असे खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले यांनी सांगितले.