मुंढवा गावठाणातील रस्त्याचा वापर केल्यास तोडफोड करण्याची धमकी

एकेकाळी पुणे शहरापासून १५ ते १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुंढवा, खराडी या गावांचा गेल्या काही वर्षांत चेहरामोहरा बदलून गेला आहे. खराडी, मगरपट्टा भागात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. उंच इमारतींमुळे मुंढवा आणि खराडी गावठाण काँक्रीटच्या जंगलात हरवून गेले आहे. मुंढव्यातून खराडी बाहय़वळण मार्गावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी होत असल्याने अनेकांनी मुंढवा गावठाणातील छोटय़ा रस्त्याचा वापर सुरू केला होता. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट वाहनचालकांना धमकावणारा फलक लावला. ‘लोकसत्ता’ने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने हा फलक हटवला.

मुंढव्यातून खराडी बाहय़वळण मार्गावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चौक आहे. या चौकात सिग्नल आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर मोठी गर्दी असते. त्यामुळे मुख्य चौकातील सिग्नल पार करायला वाहनचालकांना पाच ते दहा मिनिटे लागायची. मुख्य रस्त्यावर कोंडी असल्याने वाहनचालकांनी मुंढवा गावातील कामगार मैदानापासून जाणाऱ्या छोटय़ा रस्त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंढवा गावठाणातील पंधरा फुटांच्या रस्त्यांवरून चालणेदेखील अवघड झाले. समोरासमोर दोन मोटारी आल्यानंतर वाहतूक ठप्प व्हायची. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंढवा गावठाणातील रहिवाशांनी ‘मुंढवा गावातील रस्ते बायपासला जाणाऱ्या वाहनचालकांनी वापरू नयेत. वाहनांचे नुकसान केले जाईल ’, असा फलक लावला. हा फलक लावल्यानंतर वाहनचालक भयभीत झाले आणि त्यांनी पुन्हा हमरस्त्याचा वापर सुरू केला. हा प्रकार दै. ‘लोकसत्ता’ने मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ मुंढवा गावात लावलेला हा फलक हटवला. पोलिसांनी फलक हटवून फलक लावणाऱ्यांना एक प्रकारे अप्रत्यक्षरीत्या समज दिली.

नागरीकरणाचा वाढता वेग

केशवनगर पूर्वी ग्रामपंचायत होती. या भागाचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. या भागात अनेक गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहेत, तसेच ग्रामपंचायतीत असलेल्या केशवनगर भागात अनेक छोटय़ा इमारती  उभ्या राहिल्या. खराडी, मगरपट्टा आयटी पार्कनजीक हा भाग असल्याने या भागातील नागरीकरणाचा वेग वाढत आहे.

मुंढवा गावातील अरुंद रस्ते

मुंढवा गावात छोटय़ा गल्ल्या आहेत. पिंगळे वस्ती, घोरपडी गाव तसेच कोरेगाव पार्कातील एबीसी फार्म रस्त्याने येणारी वाहने मुंढव्यातील मुख्य रस्त्याने खराडी बाहय़वळण मार्गावर जातात. मात्र, या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर मोटारी, दुचाकी वाहने असल्याने अनेक जण पर्यायी मार्ग म्हणून गावठाणातील रस्ते वापरतात. त्यामुळे गावातील छोटय़ा गल्ल्यांमध्ये कोंडी व्हायची. ग्रामस्थांनी अंतर्गत रस्त्यावर होत असलेल्या कोंडीवर उपाय म्हणून वाहनचालकांना धमकावणारा फलक लावला असल्याची शक्यता व्यक्त केली.