बिबटय़ाचे कातडे विकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले. जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावांत ही कारवाई करण्यात आली. बाळू गववा मधे (वय २५), सोमनाथ सुखदेव मधे (वय २९, दोघे रा. चास पिंपळदरे, ता. अकोले, नगर), सूर्यकांत शांताराम काळे (वय ३२, रा.म्हसवडी, ता. संगमनेर, नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
नगर जिल्ह्य़ातील म्हसवडी गावातून तिघे जण बिबटय़ाचे कातडे विकण्यासाठी पिंपरी पेंढार गावांत येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे सापळा लावण्यात आला आणि तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन मोरे, हवालदार शरद बांबळे, विशाल साळुंके, चंद्रशेखर मगर, शफी शिलेदार, विघ्नहर गाडे, राजेंद्र पुणेकर, वसंत आंब्रे यांनी ही कारवाई केली. आरोपींनी शिकार करून बिबटय़ाचे कातडे विक्रीस आणल्याचा संशय पोलिसांना आहे.
त्यांच्याविरूद्ध ओतुर पोलीस ठाण्यात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.