दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अन्सरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधीत संघटना आहे. या तिघांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद हबीबऊर रहमान, मोहम्मद रिपन होस्सैन आणि हानन्न अन्वर खान अशी या तिघांची नावे आहेत.

एटीएसच्या माहितीनुसार, दहशतवादी घटना रोखण्यासाठी देशात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर एटीएसची करडी नजर असते. तसेच या लोकांचा कोणत्याही दहशतवादी कारयावांमध्ये सहभाग तर नाही ना याची गुप्तपणे चाचपणी केली जाते. अशा तपासणीदरम्यान, एटीएसच्या पुणे युनिटला शहर परिसरात कोणतेही अधिकृत प्रवासी कागदपत्रे नसताना अनधिकृतरित्या काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून हे तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अन्सरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेशी संबंधीत असल्याची माहिती मिलाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. ही संघटना पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असल्याचे मानले जाते.

१६ मार्च रोजी एटीएसला वानवडी आणि आकुर्डी परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, दहशतवादी पथकाने वानवडी परिसरात नेमका शोध घेतल्यानंतर त्यांनी एका बांगलादेशीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या चौकशीदरम्यान त्याने इतर दोघे आकुर्डी परिसरात राहत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या लोकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली आहेत. या तिघांनी शहरात आलेल्या इतर एबीटी ग्रुपच्या सदस्यांना राहण्यास मदत केली आहे. या तिघांपैकी एक जण संवेदनशील मानल्या जाणाऱ्या एका संस्थेजवळ नोकरी आणि राहण्यास होता.

एटीएसने ताब्यात घेतलेल्या तिन्ही बांगलादेशींची नावे कळू शकलेली नाहीत. मात्र, यांतील दोघे २५ वर्षीय तर एक जण ३१ वर्षीय तरुण आहे. तिघेही बांगलादेशातील विविध भागातील रहिवाशी आहेत. एटीएसच्या पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम जाधव आणि पथकाने ही कारवाई केली.

दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील पनवेल मधूनही एटीएसने अशाच एका कारवाईत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडूनही आधारकार्डे जप्त करण्यात आली होती.