तुमच्याकडे चारचाकी गाडी असेल तर आणि त्यात तुम्ही जर आगपेटी ठेवली असेल तर सावधान.. कारण पिंपरी चिंचवडमध्ये एका कारमध्ये बसून तीन मुले आगपेटीशी खेळत होती. त्यानंतर आगपेटीतली एक जळती काडी सीटवर पडली ज्यामुळे सीट पेटले. कारमध्ये आग लागताच आगपेटीशी खेळणारी तिन्ही मुलं गाडीतून बाहेर पडली ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या मुलांचं नशीब चांगलं होतं म्हणून त्यांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.

अवघ्या तीन मिनिटांमध्ये सीटनं पेट घेतला आणि त्यानंतर आगीचे लोळ वाढले ज्यामुळे कार तर जळालीच आणि पुढील काही मिनिटांध्ये कारच्या शेजारी असलेले दोन टेम्पोही पेटले. एका तरूणाने आपला जीव धोक्यात घालून अर्टिगा ही गाडी आगीपासून वाचवली. पिंपरीतल्या भोसरी भागात हा प्रकार दुपारी १ च्या सुमारास घडला आहे.

लहान मुलांना खेळायला सोडून दिलं की अनेकदा पालक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आज घडलेल्या घटनेतही तिन्ही लहान मुलांचा जीव गेला असता मात्र थोडक्यात तो बचावला. निदान अशा घटना समोर आल्यानंतर तरी आई वडिल आपली मुलं काय करत आहेत काय खेळ करत आहेत, त्यांचा खेळ त्यांच्या किंवा इतरांच्या जीवावर बेतणारा तर नाही ना? याकडे अधिक सजगपणे पाहतील अशी अपेक्षा आहे. ही मुलं कोण होती? कार कोणाची होती याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या पिंपरीत या सीसीटीव्ही फुटेजचीच चर्चा रंगली आहे.