अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी पुन्हा गायब झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

समुद्रातील चक्रीवादळांच्या मालिकांमुळे नोव्हेंबर कडाक्याच्या थंडीविना गेला. कोरडे हवामान आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे डिसेंबरच्या सुरुवातीपासून रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात घट नोंदविली जात होती. गेल्या आठवडय़ाच्या शेवटी राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीखाली गेल्याने थंडी अवतरली होती. कोकण विभागात मुंबईचा पाराही घसरला होता. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आदी भागांतही चांगलाच गारवा होता. मराठवाडा आणि विदर्भातही थंडी होती. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ढगाळ वातावरणामुळे जवळपास सर्वच भागांमध्ये किमान तापमानात वाढ होऊन ते काही प्रमाणात सरासरीपुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ५ अंशांनी वाढल्याने थंडी गायब झाली आहे. कोकण विभाग आणि मराठवाडय़ातही ते सरासरीपेक्षा १ ते ३ अंशांनी अधिक आहे. विदर्भातील किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने तेथे काही प्रमाणात गारवा आहे.

पाऊस शक्यता कुठे, कशामुळे?

अरबी समुद्राच्या दक्षिण- पश्चिम भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे राज्याच्या दिशेने बाष्पाचा पुरवठा होऊन थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी बहुतांश भागातून थंडी गायब झाली आहे. या बदलांमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. ११ आणि १२ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. १० डिसेंबरला कोकणात तुरळक ठिकाणी, तर १३ डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.