पुणे-नाशिक रस्त्यावर खेड तालक्यातील कुरळी गावाजवळ मंगळवारी रात्री भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. अपघातात त्याच कुटुंबातील चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि १४ वर्षांच्या त्यांच्या मुलाचा समावेश आहे. सुरेश किसन डुकरे (४०), पत्नी वंदना (३५), मुलगा तुषार (१४) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश डुकरे हे चाकणला एक धार्मिक कार्यक्रम उरकून घरी निघाले होते. त्यावेळी पुणे-नाशिक रस्त्यावर कुरळी गावाजवळ समोरून आलेल्या भरधाव जीपची त्यांच्या गाडीला जोरदार धडक झाली. त्यामध्ये सुरेश डुकरे, त्यांची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाले. चार वर्षांच्या हेमंत या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. जीपचालक संतोष शिंदे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, असेही पोलिसांनी सांगितले. चाकण पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वंदना डुकरे या देहूमधील आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करीत होत्या.